Sunday, January 15, 2017

ओवायसी विरुद्ध आझमी

owaisi abu azmi के लिए चित्र परिणाम

मुंबईतल्या बहुतांश प्रमुख पक्षांना सध्या मतविभागणीच्या चिंतेने सतावलेले आहे. त्यापैकी राष्ट्रवादी पक्षाची मुंबईतील शक्तीच क्षीण होती. मागल्या निवडणूकात त्या पक्षाने मुंबईत कॉग्रेसच्या कुबड्या घेऊन थोडेफ़ार यश मिळवलेले होते. यावेळी मुंबईत आपल्याला काडीमात्र स्थान शिल्लक उरणार नाही, याची खात्री असल्यानेच शरद पवार यांनी आघाडीच्या संकल्पनेला नव्याने उजाळा देण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या विधानसभेच्या वेळी मतदानाच्या तारखा जाहिर झाल्या असतानाच, पंधरा वर्षे जुनी आघाडी पवारांनी मोडीत काढली होती. आज दोन वर्षांनी पालिका मतदानाच्या तारखा जाहिर झाल्या असताना, पवारांना म्हणूनच आघाडीची गरज भासू लागली आहे. तीच गोष्ट तेव्हा तुटलेल्या शिवसेना भाजपा युतीची आहे. शत-प्रतिशतची भाषा दोन वर्षे बोलणार्‍या भाजपाला मुंबईत सत्ता मिळण्याची खात्री नसल्यानेच, युतीची गरज वाटू लागली आहे. आज या चारही पक्षांना मतविभागणीची चिंता सतावते आहे. पण अशी चिंता केवळ याच चार पक्षांना नाही. मुंबईच्या राजकारणामध्ये ज्यांची फ़ारशी दखल घेतली जात नाही, अशा समाजवादी पक्ष व नव्याने मुस्लिम भागात पाय रोवणार्‍या ओवायसी यांच्या मजलीस पक्षासाठीही मतविभागणी महत्वाची आहे. पण ओवायसी यांना जागा जिंकण्याची फ़िकीर नाही. त्यांना यश मिळवण्यापेक्षाही मुस्लिम मतांवर आपली मक्तेदारी प्रस्थापित करण्याची हाव आहे. त्यामधून भले सेना भाजपा यांचा लाभ झाला, तरी त्यांना फ़रक पडणार नाही. उलट तसे होताना मुस्लिम मतातले मोठे भागिदार मानल्या जाणार्‍या कॉग्रेस, राष्ट्रवादीसह अबु आझमी यांच्या समाजवादी पक्षाचा पराभव ओवायसींना महत्वाचा वाटतो आहे. कारण त्यांना मुस्लिम भागात आपला पाया विस्तारायचा आहे आणि तसे करताना अन्य भागिदार कायमचे निकालात काढायचे आहेत.

१९९५ सालात मुस्लिम लीग व कॉग्रेस यांना मागे टाकून मुस्लिम मतांवर अबु आझमी वा मुलायमच्या समाजवादी पक्षाने आपले प्रभूत्व सिद्ध केलेले होते. तेव्हा त्या पक्षाचे चार आमदार विधानसभेत निवडून आलेले होते. तीन मुंबईत तर एक भिवंडीतून आलेला होता. पैकी मुंबईतले तिन्ही आमदार कॉग्रेस पक्षात सहभागी झाले आणि समाजवादी पक्षाला कोणी खास नेता उरला नाही. तेव्हापासून मुंबईतल्या मुस्लिमांचा एकमुखी नेता म्हणून अबू आझमी मिरवत राहिले आहेत. पाच वर्षापुर्वी नांदेड व नंतर लातूर महापालिका मतदानातून ओवायसी यांच्या हैद्राबादी मुस्लिम पक्षाने महाराष्ट्रात हातपाय पसरण्यास सुरूवात केली. तिथे मोजक्या मुस्लिम बहूल भागात उमेदवार उभे करून त्यांनी नजरेत भरणारे यश मिळवले आणि नंतर विधानसभेतही तेच करून दोन आमदार निवडून आणलेले होते. पुढे बांद्रा पोटनिवडणूकीत त्याच ओवायसी बंधूंनी चार दिवस मुक्काम ठोकून आझमींचे वर्चस्व संपुष्टात आणले. आता मुंबईत आझमी यांचे नेतृत्व कितीसे शिल्लक आहे, त्याची कसोटी महापालिका मतदानतून लागायची आहे. कारण गेल्या वेळी महापालिकेत समाजवादी पक्षाने मोजके उमेदवार उभे केले, तरी आठ नगरसेवक निवडून आणलेले होते. आज त्यांच्यापाशी उत्तम भाषण देऊ शकेल आणि सभा गाजवू शकेल, असा कोणीही वक्ता नेता नाही. उलट ओवायसी बंधू सतत टिव्हीच्या चर्चेत दिसणारे व कुठल्याही युक्तीवादाला ठामपणे उत्तर देणारे म्हणून यशस्वी होत चालले आहेत. मुंबईत आपला प्रभाव दाखवण्याची संधी ते घेणारच. त्यासाठी निदान पन्नाससाठ वॉर्डामध्ये त्यांचे उमेदवार असणार आणि ते आव्हान आझमी यांच्यासाठी आहे. जिथे मुस्लिम मतांच्या गठ्ठ्यावर आझमी यांचे समाजवादी नगरसेवक निवडून येऊ शकत होते, त्यालाच खिंडार पाडण्याची ओवायसी यांची रणनिती आहे. त्यात जिंकण्याला महत्व नाही.

ओवायसी यांनी आपल्या रणनितीमध्ये जिंकण्याला प्राधान्य ठेवलेले नाही. आपले उमेदवार निवडून येण्यासाठी त्यांचा हट्ट नाही, म्हणूनच कोणाशीही जागावाटप किंवा आघाडी करण्याची त्यांची तयारी नसते. त्यांना अधिकाधिक मुस्लिम वस्त्यांमध्ये आपले कार्यकर्ते व पाठीराखे निर्माण करायचे आहेत. त्यासाठी पडायलाही उभे रहातील आणि झूंज देतील; अशा तरूणांच्या शोधात हे ओवायसी बंधू असतात. मुस्लिमांच्या जोडीला दलित पिछड्यांना सोबत घेण्याची त्यांची युद्धनिती आहे. त्यामुळे अनेक दलितांनाही ते उमेदवारी देणार. सहाजिकच कॉग्रेस, राष्ट्रवादी आणि समाजवादी यांच्या हक्काच्या मुस्लिम मतांवर डल्ला मारण्याचा डाव ते खेळत आहेत. त्यात उमेदवार जिंकतील वा जिंकणारे उमेदवार मिळावेत ही कुठलीही चिंता ओवायसींना नाही. उलट अशा मतविभागणीतून शिवसेना व भाजपा यांना लाभ मिळाला आणि त्यांचेच अधिक नगरसेवक निवडून आले, तरी ओवायसींना हवे आहेत. कारण आपलाच एकमेव पक्ष फ़क्त मुस्लिमांचा व जोडीला दलितांचा, असल्याचा देखावा त्यांना उभा करायचा आहे. त्यात अधिकाधिक सेना भाजपा उमेदवार जिंकले, तर त्याचे खापर सेक्युलर पक्षांवर फ़ोडण्याचीही मुभा ओवायसींना रहाते. किंबहूना मुस्लिम मते अशीच विभागली जातात आणि तोच सेक्युलर पक्षाचा छुपा अजेंडा असल्याचाही आरोप ओवायसी करीत असतात. मुस्लिम मतांची विभागणी करून हिंदूत्ववाद्यांनी जिंकायची खेळी सेक्युलर पक्ष करतात, हा ओवायसींचा जुनाच आरोप आहे. मग तो सिद्ध करण्यासाठी मुस्लिम मतांची विभागणी तेच करतात आणि त्याचे खापर राष्ट्रवादी व कॉग्रेस यांच्यासह समाजवादी पक्षावर करायची मोकळीक त्यांना मिळते. त्यांचे सुदैव असे आहे, की सध्या कॉग्रेस दुबळी झालेली आहे आणि समाजवादी पक्षाकडे अबु आझमी यांच्यासारखा नाकर्ता नेता आहे. परिणामी ओवायसी मुंबईत मोठे यश मिळवू शकतील.

मुंबईतील मुस्लिम मतांचा एक योगायोग इथे सांगण्यासारखा आहे. १९७३ च्या पालिका निवडणूकीत वंदे मातरम हा कळीचा मुद्दा झालेला होता आणि त्यातून मुस्लिम लीग हा एक प्रभावी मुस्लिम पक्ष म्हणून पालिकेत उदयास आला. तर वीस वर्षांनी त्याचे नमोनिशाण संपून गेले आणि १९९२ च्या पालिका मतदानात अयोध्येतील जन्मभूमीचा विषय कळीचा झालेला होता. त्यात मुस्लिम लीगला मागे टाकून कारसेवकांवर गोळी झाडणारे ‘मुल्ला मुलायम’ मुस्लिमांचे हिरो झालेले होते. त्यामुळेच मुस्लिम लीगचे अनेक नेते नगरसेवक समाजवादी पक्षात दाखल झाले आणि त्यांनाच मुस्लिमांचा पक्ष म्हणून ओळखले जाऊ लागले. त्याही मतदानात समाजवादी पक्षाचे पंधराहून अधिक नगरसेवक मुंबई पालिकेत निवडून आलेले होते. हे वीस वर्षाचे चक्र होते. आताही त्या समाजवादी उदयाला दोन दशकांच्या कालावधी उलटून गेलेला असताना, मुंबईत नव्या मुस्लिम पक्षाचे वा नेतृत्वाचे आगमन झालेले आहे. ओवायसी हा त्या पक्षाचा चेहरा आहे. त्याने विधानसभेत आपली कुवत वा झलक दाखवलेली आहे. त्याचा पुढला टप्पा म्हणून आगामी पालिका मतदानाकडे बघता येईल. त्यात किती संख्येने उमेदवार निवडून येतात, याची फ़िकीर ओवायसींना नसेल. कारण आज त्यांची पालिकेतील संख्या शून्य आहे. त्यात पाचदहा निवडून येणेसुद्धा यश असते. पण त्यापेक्षा समाजवादी पक्ष म्हणून जे कोणी मुस्लिम नेतृत्व करत आहेत, त्यांचे नामोनिशाण पुसून टाकणे; ओवायसींचे प्राधान्य आहे. जितकी मुस्लिम मतांची विभागणी होईल तितकी त्यांना हवी आहे. ती नको असलेल्या अबु आझमी यांनी ओवायसींशी हातमिळवणी करावी किंवा नामशेष व्हावे; असाच पर्याय शिल्लक आहे. दक्षिण मुंबईत ओवायसींनी ते केलेच आहे. आता त्यांना इशान्य व पुर्व मुंबईत तेच साध्य करायचे आहे. मात्र त्याकडे कोणी राजकीय विश्लेषक खास लक्ष देणार नाहीत. सेना, भाजपा वा कॉग्रेस, राष्ट्रवादी व मनसे यांचीच चर्चा होत राहिल.

2 comments:



  1. भाऊराव,

    आता गंमत बघा की १९७३ साली मुस्लिम वंदे मातरम म्हणायला तयार नव्हते. तर आज पाकिस्तानातला माजी क्रिकेटपटू आणि आजी राजकारणी इम्रान खान म्हणतो की मुस्लिमांत स्त्रियांना यथोचित आदर मिळंत नाही. आईबद्दल आदर बाळगणं यापेक्षा मोठा स्त्रीचा सन्मान काय असेल? मग वंदे मातरम म्हणायला मुस्लिमांचा विरोध नक्की कशासाठी? कुराणात नक्की कुठे म्हंटलंय की स्त्रियांना आदर देऊ नका म्हणून? खरंतर वंदे मातरम वरून हिंदू विरुद्ध मुस्लिम भांडण व्हायलाच नको.

    फास्ट फॉरवर्ड टू १९९२. अयोध्येत वादग्रस्त जागी राममंदिर होतं याचे पुरावे (जुने खांब वगैरे) उत्खननात मिळाले आहेत. आता काफिरांचं प्रार्थनास्थळ असलेल्या जागी कोणी मोमीन मशीद उभारेल काय? अशी कोणी उभारली तर ते घोर इस्लामी पातक आहे. खरंतर राममंदिरावरून हिंदू विरुद्ध मुस्लिम भांडण व्हायलाच नको.

    फास्ट फॉरवर्ड टू २०१६. औवेशा स्वत:ला मुस्लिमांचा तारणहार म्हणवतो. या माणसाने येमेनमधल्या निरपराध मुस्लिमांच्या कत्तलीविरुद्ध ब्र तरी काढलाय का स्वत:च्या तोंडातून? काढणार नाही तो. कारण ही कत्तल सौदी राजाच्या आशीर्वादाने चाललीये. आणि या औवेशाला सौदीचा पैसा मिळतोय. तो कशाला आपल्या बोलवित्या धन्याविरुद्ध तोंड उघडेल? भाऊराव, तुमच्यासारखा वा माझ्यासारखा हिंदू आक्षेप घेतील पण कोणताही भारतीय मुस्लिम नेता आवाज उठवणार नाहीये. कारण सगळे मुस्लिम नेते हरामाचा पैसा गिळून स्वस्थ बसलेत. हे म्हणे मुस्लिमांचे तारणहार!

    वरील तीनही उदाहरणांवरून एक गोष्ट सूर्यप्रकाशाइतुकी स्पष्ट होते. ती म्हणजे मुस्लिमांचे नेते भारतीय मुस्लिमांना खड्ड्यात घेऊन पडणार. यावर मुस्लिमांकडे एकंच मार्ग आहे. तो म्हणजे हिंदुत्ववादी पक्षाला मत देणे.

    आपला नम्र,
    -गामा पैलवान

    ReplyDelete