Monday, January 30, 2017

राजकारणातील प्रासंगिकता

raj uddhav के लिए चित्र परिणाम

युती तुटल्याची घोषणा झाल्यापासून महाराष्ट्रातल्या राजकारणाला व घडामोडींना वेग आलेला आहे. त्यात शिवसेना व मनसे एकत्र येण्याचीही एक बातमी आली होती. पण तिला कुठूनही दुजोरा मिळालेला नव्हता. अशा पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे चुलतबंधू राज ठाकरे, यांचा दूत म्हणून बाळा नांदगावकर मातोश्रीवर पोहोचले. त्यांनी भावाचा निरोप भावाला देण्याची भूमिका बजावली खरी. पण भावाचा निरोप ऐकायलाही भाऊ उपस्थित नव्हता, ही बाब विसरता कामा नये. खरेतर दोघेही भाऊ वेळप्रसंगी फ़ोनवर थेट बोलत असतात. त्यामुळे असा कोणी दूत पाठवण्याची गरज का भासावी, हे समजत नाही. पण या निमीत्ताने एक गोष्ट आठवते ती विधानसभेच्या वेऴची! एका वाहिनीवर सर्व वार्ताहरांशी गप्पांच्या कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे यांनी एक गौप्यस्फ़ोट युती मोडण्यासंबंधाने केलेला होता. ‘भाजपावाले शिवसेनेची दिशाभूल करीत असल्याचे स्पष्ट दिसत होते आणि तसे आपण उद्धवला बोललोही होतो. पण त्याला सत्य बघायचे नव्हते. शेवटी भाजपाने दगाबाजी केली’. इतके स्पष्ट मनसेप्रमुखाने जाहिरपणे सांगितलेले आहे. कारण युती तुटण्याचा उद्धवना धक्का बसलेला होता. पण त्याच्याविषयी चुलतभावाला असलेली आपुलकी तेव्हाही लपून राहिलेली नव्हती. तरीही त्याच्या आधी वा नंतर, जेव्हा कोणी दोन भावांमधले मतभेद संपवण्यासाठी प्रयास केला; त्यात यश मिळालेले नाही. एकदा तर एका हाताने टाळी वाजत नाही असेही यापैकी एक भाऊ बोलल्याचे आपण जाणतो. सहाजिकच आता राज ठाकरेंचा दूत मातोश्रीवर गेल्यावर काय घडले, तेही डोळसपणे बघायला हरकत नसावी. मातोश्रीवर आपला दूत पाठवून राजनी टाळीसाठी हात पुढे केला आहे. पण टाळी वाजायला आवश्यक असलेला दुसरा हात तिथे उपस्थितच नव्हता.

सध्या अनेक पक्षातून इच्छुक उमेदवार व आजीमाजी नगरसेवक नेते शिवसेनेत दाखल होत आहेत. त्यांचे स्वागत मातोश्रीवरच पक्षप्रमुखांनी केल्याचे बातम्यातूनही सांगितले जात आहे. अशा कालखंडात बाळा नांदगावकर तिथे पोहोचले, तर तेव्हा त्यांना उद्धव भेटू शकले नाहीत; ही गोष्ट खटकणारी आहे. या दूताला आपला निरोप पक्षप्रमुखांच्या सहकार्‍यांकडे ठेवून मागे फ़िरावे लागले, हे कितपत योग्य आहे? खरेच दोन भावातील वितुष्ट इतक्या थराला गेलेले आहे काय? काही प्रसंगी व्यक्तीगत भांडणे व वाद बाजूला ठेवून राजकारण करावे लागते. प्रामुख्याने जेव्हा राजकारणातील मोठे डाव खेळायचे असतात, तेव्हा किरकोळ मतभेद गुंडाळून राजकीय डावपेच खेळणे भाग असते. त्यामुळेच काहीप्रसंगी प्रतिस्पर्धी वा शत्रूशीही हातमिळवणी करावी लागत असते. १९७३ साली मुंबई महापालिकेत वंदे मातरम या राष्ट्रगीताचा सन्मान राखण्यावरून खडाजंगी उडाली होती. सहाजिकच तो निवडणूकीतला कळीचा मुद्दा होऊन गेला. अमिन खंडवाणी नावाच्या कॉग्रेस नगरसेवकाने वंदे मातरम म्हणायला नकार दिल्याने वाद निर्माण झाला होता. अशावेळी त्याच खंडवाणीला पराभूत करण्यासाठी बाळासाहेबांनी माहिम कोळीवाड्यातील शेकापनेते भाई बंदरकर यांना सेनेचा पाठींबा देऊन टाकला होता. मग निकाल लागले आणि पालिकेचे समिकरण जुळवण्याची वेळ आली. तेव्हा सुधीरभाऊ जोशी या शिवसैनिकाला महापौरपदी बसवण्यासाठी आणि कॉग्रेसला सत्तेपासून दूर राखण्यासाठी, शिवसेनेने मुस्लिम लीगच्या डझनभर नगरसेवकांचा पाठींबा घेतला होता. राजकारणात व्यक्तीगत रागलोभ बाजूला ठेवून मोठ्या हेतूला साध्य करण्यासाठी कशी लवचिकता असायला हवी. त्याचा तोच धडा होता. तेवढ्याने कधी मुस्लिम लीगची भूमिका सेनेने पत्करली नाही किंवा दोघातले भांडण संपुष्टात आलेले नव्हते. ती काळाची व प्रसंगाची गरज होती.

आज भाजपाने मुंबईसह महाराष्ट्रात शिवसेनेला आव्हान उभे केले आहे आणि ते परतून लावण्याला प्राधान्य आहे. असेच आव्हान शिवसेनेच्या अस्तित्वाला सुरूंग लागावा तसे राज ठाकरे यांनी सात वर्षापुर्वी उभे केलेले होते. मुंबईतही शिवसेनेपेक्षा अधिक आमदार निवडून आणताना अधिकाधिक सेना उमेदवार पाडण्याचे डावपेच राजने खेळले होते. अशावेळी भाजपाशी जुळते घेण्याचा लवचिकपणा उद्धव यांनी दाखवला होता. मुंबईच्या बीकेसी मैदानावर मोदींची पहिली सभा योजलेली असतानाही मोदी जवळच्या मातोश्रीवर फ़िरकले नाहीत. म्हणून वर्तमानपत्रांनी कंड्या पिकलेल्या होत्या. त्यावेळी उद्धव यांनी संयम व समजूतदारपणा दाखवला. अहंकार बाजूला ठेवून भाजपाशी वा मोदींशी जुळते घेतले. ती माघार असण्यापेक्षाही मनसेचे आव्हान मोडून काढण्याची खेळी होती. कारण मनसेने शिवसेनेचा पायाच खणायला घेतला होता. त्या आव्हानाला नेस्त्तनाबूत करण्याला तेव्हा प्राधान्य होते. त्यासाठी भाजपाशी युती ही सेनेची गरज होती. आज चित्र बदललेले आहे. भाजपाच्या मदतीनेच मनसे खच्ची करण्यात यशस्वी झालेल्या उद्धवना, विधानसभेत मनसेची मराठी मते आपल्याकडे आणून एकहाती मनसेवर मात करता आली. पण दरम्यान कालचा मित्र भाजपा आज सेनेचा पायाच उखडून टाकण्याचा पवित्रा घेऊन सामोरा आलेला आहे. अशावेळी दुबळ्या झालेल्या मनसेला हाताशी धरून भाजपाला मुंबईतील मराठी अस्मितेची झलक दाखवून देण्याला प्राधान्य आहे. त्यासाठी राज ठाकरे यांना प्रतिसाद देण्याने शिवसेनेची प्रतिष्ठा कुठेही तसूभर कमी होणार नाही. कितीही मरगळल्या मनसेची मुठभर मते अजून शिल्लक आहेत आणि त्यामुळे कित्येक मतदारसंघात शिवसेनेचे पारडे जड होऊ शकते. पालिकेच्या निवडणूकीत दोनपाचशे मतांनाही वजन असते आणि तेवढ्याने दहापंधरा सेना नगरसेवकांची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

गुजरात दंगलीनंतर वाजपेयी सरकारमधून आपल्या मंत्रीपदाचा राजिनामा देऊन रामविलास पासवान बाहेर पडले आणि तिथूनच देशव्यापी मोदीविरोधी आघाडी उघडली गेली. पण २०१४च्या लोकसभा मतदानात एक एक जागा प्रतिष्ठेची असल्याचे ओळखून टाळीसाठी हात पुढे केलेल्या त्याच पासवानांना नरेंद्र मोदींनी सोबत घेतले होते. कारण व्यक्तीगत रागलोभापेक्षाही कॉग्रेसला व पुरोगाम्यांना खच्ची करून बहूमताचा पल्ला गाठण्याला प्राधान्य होते. राजकारण प्राधान्याच्या कलाने चालते. महाराष्ट्रात आज शिवसेनेच्या अस्तित्वाला व मराठी अस्मितेला आव्हान उभे करण्यात आलेले आहे आणि अशावेळी मनसेला सोबत घेतल्याने एकजूट होणारी सर्वच मते मराठीला पुष्टी देणारी असतील. म्हणूनच भाजपाचा धाकटा भाऊ होऊन रहाण्यापेक्षाही राजचा थोरला भाऊ म्हणून मनाचा मोठेपणा दाखवणे अगत्याचे असेल. किंबहूना नुसत्या अशा एका टाळीनेही भाजपाच्या गोटात खळबळ माजून जाऊ शकेल. लोकसभेपुर्वी व नंतरही भाजपाच्या अनेक नेत्यांनी कृष्णकुंजावर जाऊन पायर्‍या उगाच झिजवल्या नाही. त्यामागे असेच राजकीय डावपेच होते व असतात. गेल्या विधानसभेत मनसेची मते सेनेच्या पारड्यात पडली असती, तर मुंबईत भाजपाला अधिक आमदार निवडून आले म्हणून मिरवता आले नसते. आजही त्या मनसे मतांचे वजन विसरून चालणार नाही. किमान ५०-६० वॉर्डात तरी निकालांना निर्णायक कलाटणी देण्याचे वजन मनसेच्या मतांमध्ये नक्कीच आहे. भाजपाला ६० जागा देऊ केल्या, त्याच मनसेला देऊ केल्यास सेनेला आपल्याच शंभराच्या पलिकडे जागा पादाक्रांत करता येतील. संधी एकदा येते आणि तिच्याकडे पाठ फ़िरवून भागत नाही. शिवाय विनाअट आलेली संधी अधिक लाभदायक असते. फ़ार कशाला मनसेच्या शिवसेनेतील विलिनीकरणाचा त्यातून मुहूर्तही साधला जाणारच नाही, असे कोणी छातीठोकपणे सांगू शकेल काय?


4 comments:

  1. "अस्तित्वाला व मराठी अस्मितेला आव्हान उभे करण्यात आलेले आहे आणि अशावेळी मनसे" म्हणजेच एखाद्या पक्षासोबत मतभेद म्हणजे मराठी अस्मितेला विरोध का? हे पटत नाही.....

    ReplyDelete
  2. marathi manasacha bhlyasathi ani mumbai sathi doghani ekatra yave.

    ReplyDelete
  3. Very very good and positive journalism.

    ReplyDelete
  4. I think Uddhav is having an inferiority complex and hence is not going with MNS..

    ReplyDelete