Sunday, January 8, 2017

अनंत वेलणकर गेला

Image result for om puri ardh satya

ज्या जमान्यात राजेश खन्ना व अमिताभ बच्चन गाजत होते, तेव्हा प्रायोगिक चित्रपटातून पडद्यावर आलेल्या एका कलाकाराने ओबडधोबड चेहराही लोकांना आवडतो, हे सिद्ध केले. त्याचे नाव होते ओम पुरी. तसा त्याचा पहिला चित्रपट म्हणजे ‘घाशिराम कोतवाल’ या गाजलेल्या मराठी नाटकाचे चित्रपट रुपांतर. पण त्याचा फ़ारसा गाजावाजा झाला नाही. मग त्याच नाटकाचे लेखक विजय तेंडूलकर यांनी हिंदी चित्रपटाच्या पटकथा लिहीण्याचे मनावर घेतले, त्यातला आरंभीचा चित्रपट होता ‘आक्रोश’. याच चित्रपटातून हा ओबडधोबड चेहरा नायक म्हणून पडद्यावर आला. त्याने त्यातल्या आदिवासी तरूणाच्या भावनांचा अपुर्‍या शब्दात असा अविष्कार प्रेक्षकांना घडवला, की त्यानंतर अनेक कलासक्त प्रायोगिक कलाकारांना बॉलीवुडचा रस्ता खुला करून दिला. ‘आक्रोश’मध्ये मिळालेली भूमिका हे खरेच अग्निदिव्य होते. कारण तो त्याचा नायक म्हणून पहिला चित्रपट होता आणि त्यात त्याला जणु अबोल पात्र उभे करायचे होते. दुबळी काटक शरीरकाठी आणि राकट चेहरा, एवढ्याच भांडवलावर या अभिनेत्याने अवघा पडदाच व्यापून टाकला. मग तेंडुलकरांचीच पटकथा असलेला ‘अर्धसत्य’ त्याला वेगळ्या रुपात घेऊन पडद्यावर आला आणि तिथून ओम पुरी एक अभिनेता म्हणूनच मान्यता पावला. कथानकात जे पात्र रंगवायचे, त्यात तो इतका समरस होऊन जायचा, की त्याची प्रत्येकवेळी वेगळी ओळख प्रेक्षकाला व्हायची. ज्याच्या नावावर चित्रपट चालावा, असा अभिनेता होण्यापेक्षा पात्रामध्ये आणि कथेत स्वत:ला बेमालूम मिसळून टाकण्याची त्याची शैली अवर्णनीय होती. सततच्या अन्यायाने करपून गेलेला एक आदिवासी ज्वालामुखी असलेला ओम पुरी, पुढल्या चित्रपटात आपल्या हाती असलेल्या अधिकाराचा वापर गैरवापर करणारा उद्धट उर्मट अरेरावी करणारा एक पोलिस अधिकारी म्हणून समोर येतो, तेव्हा त्यांची तुलनाही करणे कठीण होऊन जाते.

अभिनेता खास सुंदर रुबाबदार असायला हवा, ह्या हिंदी चित्रपटाच्या प्रस्थापित कल्पनेला या माणसाने छेद दिला. त्यासाठी श्याम बेनेगल वा गोविंद निहलानी अशा दिग्दर्शकांनी त्याच्यावर विश्वासही दाखवला होता. हे रत्न शोधून काढण्याचे श्रेय त्यांनाच द्यावे लागेल. कारण त्यांनी त्याच्या देहयष्टी वा चेहर्‍यापेक्षा उत्कृष्ठ अभिनय बघून त्याला अशा भूमिका दिल्या. आपण नावाजलेल्या स्टार कलाकारांच्या गप्पा ऐकतो. त्यात भूमिका वा कथेला न्याय देण्याच्या पोकळ बाता होत असतात. पण कथा वा भूमिकेला न्याय देताना त्यातले आपले व्यक्तीमत्व किती कलाकार हरवून बसायला तयार असतात. चित्रपट कुठलाही असो वा कथा काहीही असो. त्यात शाहरुख, सलमान वा अमिताभ बघायच्या जमान्यात लोकांनी ओम पुरी बघितला, तो त्याच्या अभिनयासाठी! कारण जे चोखंदळ प्रेक्षक असतात, त्यांना अभिनय आणि कथेचा रसास्वाद घ्यायचा असतो. ओम पुरीने त्यांना अपुर्व समाधान दिले. एका बाजूला अशा गंभीर व विविध अभिनयाच्या छटा दाखवणारा हा कलाकार, ‘जाने भी दो यारो’ या चित्रपटात विनोदी भूमिका करायला धजावला, याचे त्याच्या मोजक्या चहात्यांनाही नवल वाटलेले होते. कारण अभिनय करताना वा अन्यवेळीही ओम पुरी थिल्लर वा विनोदी व्यक्ती नव्हता. पण ‘यारो’मधली त्याची भूमिका थक्क करून सोडण्याइतकी विनोदी झालेली होती. त्यासाठी आपल्याला अपरंपार कष्ट घ्यावे लागले असेही त्याने मग एका मुलाखतीत सांगितले होते. कारण आपल्या स्वभावात विनोद नाही, हे त्याने प्रामाणिकपणे मान्य केलेले होते. अशा रितीने आपल्यातली विविधता सिद्ध केल्यावर धंदेवाईक हिंदी निर्माते दिग्दर्शकांचेही त्याच्याकडे गेले. कारण त्याच्याच अप्रतिम अभिनयाने प्रायोगिक चित्रपटांनाही गल्ला मिळवून दिलेला होता. पण त्याची म्हणावी तशी कदर इथे झाली नाही.

हिंदी वा भारतीय कशाला, इंग्रजी चित्रपटातही त्याला अनेकदा संधी मिळाली. एका अशाच चित्रपटात ब्रिटिश महिलेशी विवाह करून पाकिस्तानी मनोवृत्तीने जगणारा एक पुराणमतवादी मुस्लिम त्याने इतका अप्रतिम रंगवला होता, की त्याचे जगभर कौतुक झाले. पण त्याच्या तोलामोलाच्या भूमिका निर्माण करणारे वा कथा रंगवणारे कोणी तेंडुलकरांच्या नंतर झालेच नाहीत. त्यामुळे काहीसे नैराश्य या कलावंतामध्ये आले असेल तर नवल नाही. रंगमंचावर कारकिर्द सुरू करून अतिशय कष्टप्रद पुर्वायुष्य जगलेल्या या कलाकाराने, जगण्यातही तितकेच स्वातंत्र्य भोगले. बहुतांश कलाकार आपापले मतलब ओळखून वागत बोलत असताना. मनातले स्पष्ट बोलून टाकण्याचे धाडस ओम पुरीने अनेकदा दाखवलेले होते. त्यासाठी त्याला प्रेक्षक व चहात्यांच्या शिव्या खाण्याची वेळ आलेली आहे. अण्णांच्या लोकपाल आंदोलनात हा माणूस परस्पर जाऊन पोहोचला. तेव्हा त्याच्यापाशी आमिरखान याच्यासारखा व्यवहारीपणा नव्हता. आमिरखान मेधा पाटकर वा अण्णांच्या आंदोलनात भेट द्यायला गेला होता, तेव्हा आपल्याला सामाजिक भान असल्याचा डंका पिटायला गेला, हे विसरता कामा नये. अनेक कलाकार तसेच करतात. पण लोकपाल आंदोलनाच्या गर्दीत ओम पुरी पोहोचला, तो एक सामान्य माणसासारखा आणि जे काही बोलून गेला तेही सामान्य माणसाचीच भावना होती. त्यावरून गदारोळ झाला आणि संसदेतही वादळ उठले होते. मग त्याने बिनशर्त माफ़ीही मागून टाकली. तिथे अकारण अविष्कार स्वातंत्र्य वा मतभिन्नतेचा आडोसा घेतला नाही. आपण जे आहोत, ते कुठेही झाकून न ठेवता हा माणूस जगला. प्रकाशझोतात असताना वा कॅमेरापासून दूर असतानाही, तो सामान्य माणूसच राहिला. म्हणूनच बोलताना वा माघार घेताना त्याचा अहंकार आडवा आला नाही, की नाटके करावी लागली नाहीत.

ज्या जगात ओम पुरी जगत होता, ते देखाव्याचे जग होते आणि तिथे आपली प्रतिष्ठा मिळवायला वा राखायलाही अनेक कसरती कराव्या लागतात. त्या चाकोरीत कुठेही बसायची कुवत त्याच्यापाशी नव्हती. पण अस्सल अभिनय त्याने गेल्या तीस वर्षात सादर केला. सई परांजपे यांच्या ‘स्पर्श’मधला नासिरचा अंध मित्र अथवा ‘हेराफ़ेरी’मधला हास्यास्पद वेंधळा पंजाबी त्याने जितक्या सहजतेने रंगवला, ती अभिनय गुणांची साक्ष होती. पण तोच आवडता ओम पुरी मध्यंतरीच्या पाक कलावंत प्रकरणात लोकांचा रोष ओढवून घेणारा झाला. सीमेवर बळी जाणारे सैनिक मरायलाच भरती होतात, असे बोलून गेला आणि त्यातली चुक लक्षात आल्यावर शहीद झालेल्या एका जवानाच्या अंत्यविधीमध्ये सहभागी होऊन ढसढसा रडलाही. त्याच्यातल्या अस्सल सामान्य माणसाचा तो साक्षात्कार होता. त्या काळात अनेक वाहिन्यांवर आपली विधाने समर्थनीय ठरवताना त्याची उडालेली तारांबळ आपण बघितलीच होती. पण जेव्हा त्यातल्या दुखावलेल्या भावना उमजल्या, तेव्हा शरणागती पत्करायला, त्याचा अहंकार आडवा आला नाही. ही बाब विसरता येणार नाही. कशामुळे प्रसिद्धी मिळेल वा कुठला लाभ होऊ शकेल, असे कुठलेही समिकरण मांडून जगणारा तो माणुस नव्हता. म्हणूनच स्वच्छंदी जीवन जगू शकला. विविध भूमिकांमध्ये स्वत:ला हरवून त्या पात्रांना अजरामर करून गेला. ‘अर्धसत्य’मधला अनंत वेलणकर कुठल्याही पोलिस ठाण्यात भेटणारा लबाड तितकाच कर्तव्यदक्ष मिश्रणाचा पोलिस अधिकारी नाही काय? आता ओम पुरीने इहालोकीची यात्रा संपवली आहे. पण त्याचे चित्रपट व अर्धसत्य ज्यांनी बघितलाय, त्यांना कुठेही खाकी वर्दीतला अधिकारी दिसेल, तेव्हा त्याचे स्मरण झाल्याशिवाय रहाणार नाही. कारण तुमच्या आमच्या जीवनात अशा कलाकारांच्या भूमिकाच खर्‍या असतात. त्यातून ते कलाकार आपल्या जीवनाचे एक अंग बनून जातात.

2 comments:

  1. भावपूर्ण श्रद्धांजली

    ReplyDelete
  2. अप्रतिम लिहिले आहे.एक नविन ओळख करून दिली

    ReplyDelete