Tuesday, January 31, 2017

हाफ़ीजला वाचवण्यासाठी अटक

hafeez arrested के लिए चित्र परिणाम

अमेरिकेत सत्तांतर झाले आणि जगात अतर्क्य घटना घडू लागल्या आहेत. त्याचा ताजा पुरावा म्हणजे लष्करे तोयबाचा संस्थापक आणि त्याचेच नवे रुप असलेल्या जमात उद दावा संघटनेचा म्होरक्या, सईद हाफ़ीज याला झालेली अटक! खरेतर अकस्मात अशी अटक होण्याचे नवे काही कारण समोर आलेले नाही. दिर्घकाळ काश्मिर वा अन्य भारतीय प्रदेशात प्रशिक्षित घातपाती पाठवण्याचे अनेक आरोप हाफ़ीजवर आहेत. त्या संबंधात भारताने अनेकदा तक्रारी केलेल्या आहेत. मुंबईवर कसाब टोळीने हल्ला केल्यानंतर भारताने हाफ़ीज विरोधातले सज्जड पुरावे पाकिस्तानला सुपूर्द केलेले होते. त्यानुसार या इसमावर गुन्हे दाखल करण्याचाही आग्रह धरलेला आहे. पण पाकिस्तानने तशी कुठलीही कारवाई करण्याचा प्रयत्नही केलेला नव्हता. पुढे मुंबई हल्ल्याच्या संदर्भाने तपास व पुरावे समोर आल्यामुळे; अमेरिका व राष्ट्रसंघ यांनी पाकिस्तानातील अनेक संघटनांवर प्रतिबंध लागू केले. त्यात लष्करे तोयबाचा समावेश होता आणि नंतर जमात उद दावाचाही समावेश झाला. शेवटी अशी वेळ आली, की खुद्द हाफ़ीजलाच अमेरिकेने दहशतवादी म्हणून घोषित केले आणि त्याच्या हत्येसाठी कोट्यवधी डॉलर्सचे बक्षीसही जाहिर केलेले आहे. इतके होऊनही हाफ़ीज पाकिस्तानात मोकाट फ़िरत राहिला आणि भारताला उध्वस्त करण्याच्या धमक्या देत राहिलेला आहे. अशा पार्श्वभूमीवर आताच अचानक त्याला पाक पोलिसांनी उचलून नजरकैदेत टाकण्याचे रहस्य उलगडण्याची गरज आहे. ते रहस्य फ़ारसे गुंतागुंतीचे नाही. त्यामागे डोनाल्ड ट्रंप नामक अमेरिकेन अध्यक्षांच्या वर्तनाचा वचक कारणीभूत झाला आहे. कारण या माणसाने सत्ता हाती येताच, आपल्या अनेक धोरणांचा थेट अंमल सुरू केला आहे. त्यातून पाकिस्तानचे धाबे दणाणले आहे. जिहादची मस्ती उतरायला आरंभ झालेला आहे. अन्यथा कोणी हाफ़ीजला हात लावू धजला नसता.

अमेरिकेचा अध्यक्ष हा अतिशय शक्तीमान असतो आणि तो काय करू शकतो, हे जॉर्ज बुश व ओबामा यांनी दाखवलेले आहे. अफ़गाणिस्तानमध्ये सत्तेत असलेल्या तालीबानांनी ओसामा बिन लादेन याला अहस्तांतरीत करण्यास नकार दिला; तेव्हा बुश यांनी थेट आक्रमण करून अफ़गाणिस्तानात सेना घुसवली होती. त्यामुळे शांतता प्रस्थापित झालेली नसेल. पण तो देश पुरता उध्वस्त होऊन गेलेला आहे. त्यानंतर सामुहिक विध्वंसाची शस्त्रास्त्रे बनवत असल्याचा आरोप ठेवून बुश यांनी इराकवर हल्ला केला होता. तोही देश आज संपुर्ण उध्वस्त झाला आहे. भले तिथे अमेरिकेला हवी तशी लोकशाही वा शांतता प्रस्थापित होऊ शकलेली नसेल. पण तोपर्यंत या देशांमध्ये जे सत्ताधीश होते; त्यांचे नामोनिशाण आज शिल्लक उरलेले नाही. लोकसंख्येसह ते देशही उजाड होऊन गेलेले आहेत. जिहादची मस्ती दाखवण्याचे दुष्परिणाम त्यांना असे भोगावे लागलेले आहेत. पाकिस्तानला त्याच दिशेने जायचे आहे काय? ट्रंप यांनी तसा थेट प्रश्न पाकिस्तानला विचारलेला नाही किंवा धमकीही दिलेली नाही. पण ज्या हालचाली ट्रंप करीत आहेत वा गेल्या दोन आठवड्यात त्यांनी जे निर्णय घेतले आहेत; त्याकडे बघता पाकिस्तान या माणसाच्या रोषाचे लक्ष्य व्हायला वेळ लागणार नाही. ट्रंप सत्तेत येण्याच्या आधीपासूनच अमेरिकन संसदेत पाकिस्तानला दिल्या जाणार्‍या अनुदान व मदतीविरोधात आवाज उठू लागला होता. प्रमुख दोन्ही पक्षातले अनेक सदस्य पाकिस्तानला कुठलीही मदत देण्याच्या विरोधात एकवटू लागलेले होते. अशा पार्श्वभूमीवर ट्रंप यांच्यासारखा खमक्या माणूस अमेरिकेचा अध्यक्ष झालेला आहे आणि त्याला खेळवणे पाकिस्तानला शक्य राहिलेले नाही. म्हणूनच त्याने काही करण्यापुर्वीच, त्याची मर्जी संपादन करण्याच्या अगतिकतेने पाकला सध्या पछाडलेले आहे. हाफ़ीजची अटक त्यातूनच आलेली आहे.

सत्तेत आल्यावर अल्पावधीतच ट्रंप यांनी जहाल इस्लामी दहशतवादी मानासिकतेला खच्ची करण्याचा निर्धार व्यक्त केला. अध्यक्षपदाची शपथ घेतली, त्याच मंचावरून त्यांनी लगेच जगाला तसा इशारा देऊन टाकला. पृथ्वीतलावरून जिहादी हिंसेला पुसून टाकण्याची भाषा वापरलेली होती. राष्ट्रपती निवासात पोहोचल्यावर अवघ्या एका आठवड्यात त्यांनी पश्चीम आशियातील युद्धग्रस्त मुस्लिम देशांपैकी, सहा देशातील कोणाही मुस्लिम नागरिक वा निर्वासितांना अमेरिकेत प्रवेश नाकारण्याचा अध्यादेश जारी केला. त्यातून त्यांच्या निर्धाराचा अंदाज येऊ शकतो. हा माणुस राजकारणी नसून, त्या्चा परिणाम व निकालावर विश्वास असल्याची खात्री पटते. म्हणूनच त्याने कुठल्याही जिहादी वा मुस्लिम संघटनेचे नाव घेऊन बोलण्यापेक्षा, थेट जिहादी मानसिकता व प्रवृत्तीलाच खतम करण्याची भूमिका घेतलेली आहे. अमूक नावाची संघटना जिहादी आहे किंवा नाही आणि तमूक नावात दहशतवाद असतो किंवा नाही; असल्या चर्चेचे गुर्‍हाळ घालण्यात ट्रंप यांना रस नाही. म्हणूनच त्यांनी कोण चांगला किंवा कोण हिंसाचारी; असल्या भानगडीत पडायचे नाकारले आहे. ज्या देशांना व समाजांना हिंसाचारी मानसिकेतेने पछाडले आहे, त्यांची सावली अमेरिकन भूमीवर पडू नये; असे सरसकट पाऊल उचलले आहे. त्यासाठी सहा देशांची यादी जारी करून तिथल्या मुस्लिम नागरिकांना अमेरिकन भूमीवर पाऊल ठेवण्यास प्रतिबंध घातलेला आहे. अशा यादीत लौकरच पाकिस्तानचे नाव येऊ शकते, अशी वदंता उठली आणि पाकिस्तानचे धाबे दणाणले आहे. कारण पाकिस्तान अमेरिकेच्या अनुदान व मदतीवरच गुजराण करीत असतो. शिवाय अनेक पाकिस्तानी नागरिकांच्या अमेरिकेतील व्यापार उलाढालीतून पाकला पैसा मिळत असतो. त्याचाच गळा घोटला जाण्याच्या भयाने त्या देशाला व सरकारला सध्या पछाडले आहे. त्यासाठीच हाफ़ीजला नजरकैदेत टाकलेला आहे.

दिर्घकाळ राष्ट्रसंघ व अमेरिकेने हाफ़ीज व त्याच्या संघटनेला दहशतवादी घोषित केलेले आहे. पण त्याच्या विरोधात कुठलेही पाऊल पाक सरकारने उचललेले नाही. उलट त्याच्या उचापतींना आश्रय, अभय व सहाय्य करण्याच्याच भूमिकेत पाकिस्तानी राज्यकर्ते राहिलेले आहेत. त्यासाठी अमेरिकन सरकार व अध्यक्षांनी आग्रह केला तरी काणाडोळा करण्यात आलेला होता. खरेतर त्याला शह देणे ओबामा यांनाही शक्य होते. पाकच्याच आश्रयाने दडी मारून बसलेल्या ओसामा बिन लादेनला अमेरिकी कमांडोंनी गुपचुप जाऊन ठार मारले. मग उजळमाथ्याने पाकिस्तानात सभा मेळावे भरवणार्‍या हाफ़ीजला अमेरिका संपवू शकत नव्हती काय? जरूर शक्य होते. पण ओबामांच्या धोरणात जिहादला संपवणे बसत नव्हते. जिहाद विरोधी बोलायचे आणि व्यवहारात जिहादींना पाठीशी घालायचे; असा दुटप्पीपणा अमेरिकन सरकार करीत होते. म्हणूनच पाकिस्तानात हाफ़ीजसारखे माथेफ़िरू सोकावलेले होते. पण आता अमेरिकेत सत्तांतर झाले आहे आणि ट्रंप हा सोज्वळ बुद्धीवादी राजकारणी नाही. म्हणूनच तो नुसता वाचाळही नाही. तो कृती करू शकतो. त्याचा अर्थ ओसामाला पाकमध्ये घुसून ठार मारला, तसाच हाफ़ीजचाही काटा काढला जाऊ शकतो. याविषयी पाकिस्तानच्या मनात शंका उरलेली नाही. त्यापासून ह्या जिहादीला वाचवण्यासाठीच त्याला अटक झालेली आहे. हाफ़ीजला प्रोटेक्टिव्ह कस्टडीत घेण्यात आलेले आहे. आरोपी म्हणून नव्हेतर त्याच्या जीवाला असलेल्या धोक्यातून सुरक्षित राखण्यासाठी, ही कारवाई झालेली आहे. कदाचित हा धोका भारतीय कमांडोपासून असेल किंवा ट्रंप यांच्या प्रशासनाचे आदेशही भयभीत करणारे असतील. पण ही हाफ़ीज विरोधातली कारवाई नव्हे. त्याला दिलेले हे संरक्षण आहे. म्हणूनच कोणा भारतीयांनी खुश होण्याचे कारण नाही. कारण अजून तरी ट्रंप महाशयांनी पाकविषयी मौन धारण केलेले आहे.

3 comments:

  1. पण ट्रम्प ने एच1बी वीजा वाढवल्यामुळे भारतीय अभियंता चे काय आपला पण नुकस।न झालेच कि

    ReplyDelete
  2. ट्रंप यांना हिटलर संबोधून बाजूला सारता येणार नाही. जगाचे राजकारण आता वेगळ्या वळणावर येऊन पोचले आहे. मुस्लीमांना बदलण्याची कदाचित हि शेवटची संधी असेल , त्यानंतर बहुधा वेळ निघुन गेलेली असेल.

    ReplyDelete