गेला महिनाभर उत्तरप्रदेशातील सत्ताधारी समाजवादी पक्षातील फ़ाटाफ़ुटीचा गाजावाजा झाल्यावर, तिथे भाजपाला यश मिळण्याची सेक्युलर भिती व्यक्त झाली होती. अकस्मात आता तेच जाणकार समाजवादी पक्षाला पुन्हा विधानसभेत यश मिळण्याची गणिते मांडू लागले आहेत. कारण फ़ाटाफ़ुट मागे पडून मुलामयपुत्र अखिलेशने पक्षावर कब्जा मिळवला आहे आणि कॉग्रेसशी यशस्वी युतीही झालेली आहे. पण नुसती युती त्या दोन पक्षांना उत्तरप्रदेशची सत्ता मिळवून देईल, असा दावा करायची कोणाला हिंमत झालेली नाही. सहाजिकच त्या विजयाची शक्यता वर्तवताना काहीतरी चमत्कार घडण्याची हमी देण्याला पर्याय नव्हता. म्हणून तर प्रियंका गांधी याच चमत्कार घडवणार असल्याची पुडी सोडून देण्यात आलेली आहे. गेल्या आठवड्यात होऊ घातलेली युती तुटण्यापासून, ती युती पुन्हा जुळवून आणण्यापर्यंतच्या अनेक बातम्या रंगवल्या गेल्या. अखेरीस प्रियंकामुळेच युती होऊ शकल्याचे सांगण्यात आले. ही युती घडवण्याची प्रियंकाची चतुराई इतका कौतुकाचा विषय झाला आहे, की आता तीच कॉग्रेसला गाळातून बाहेर काढणार असून, लौकरच मोदी सरकारचा कारभार आटोपेल, अशी चाहुल अनेक राजकीय विश्लेषकांना लागली आहे. खरेतर अशीच काहीशी चाहुल पाच वर्षापुर्वी याच अभ्यासकांना लागलेली होती आणि असेच कौतुक राहुल गांधींच्या चतुराई व कुशलतेचे चाललेले होते. पण निकाल लागले, तेव्हा बघण्यासारखे चेहरे अशाच जाणत्यांचे झालेले होते. कारण राहुल कॉग्रेसला सत्तेपर्यंत आणू शकले नव्हते, तर पक्ष चौथ्याच क्रमांकावर राहिला होता. यावेळी तशीच काही किमया प्रियंका घडवत असल्याचा जाणत्यांचा साक्षात्कार म्हणूनच समजून घेतला पाहिजे. त्यातला पहिला प्रश्न राहुल नालायक असल्याची ही कबुली आहे काय? प्रियंका कॉग्रेसला सावरणार असेल, तर कॉग्रेसला बुडवले कोणी?
अनेक भारतीय भाषांमध्ये ‘झाकली मूठ’ अशी एक म्हण आहे. याचा अर्थ झाकलेल्या मुठीत काय आहे, त्याचा उलगडा सहज होत नसतो. म्हणूनच ती मुठ झाकलेली असेपर्यंतच तिचे कौतुक असते. ती उघडली गेल्यास मोठा भ्रमनिरस होऊ शकत असतो. म्हणून मुठ झाकलेली रहाण्यातच तिची महत्ता कायम असते. प्रियंका गांधी ही अशीच एक झाकलेली मुठ आहे. गेल्या दहा वर्षात अनेकदा त्या झाकल्या मुठीचे कौतुक अधूनमधून होत राहिले. पण ती मुठ उघडण्याची हिंमत कॉग्रेसला झाली नाही, की खुद्द प्रियंकानेही कधी आपली मुठ उघडून, त्याचा प्रत्यय कोणाला घडवला नाही. उलट थोरल्या भावाच्या नाकर्तेपणावरचा जालीम उपाय म्हणून प्रियंकाकडे बघितले जावे, असा गोलमाल होत राहिला. काही घराणेनिष्ठ पत्रकार अभ्यासकांना नेहमी प्रियंकामध्ये भविष्यातल्या इंदिराजी दिसत राहिल्या आहेत. मात्र त्याची चुणूक कधीही दिसली नाही. अमेठी रायबरेली या घरच्या मतदारसंघात ही कन्या गालाला खळी पाडणारे हसून, कॅमेरासमोर येण्यापलिकडे काहीही करू शकलेली नाही. या दहा वर्षात अनेक निवडणूका झाल्या, त्यातही कधी या दोन लोकसभा मतदारसंघाची लक्ष्मणरेषा प्रियंकाने ओलांडली नाही. तसे झाले मग राखून ठेवलेला कॉग्रेसचा हुकूमाचा पत्ता, अशी मुठ अधिक आवळून ठेवली गेली. पण मुठीत काय लपलेले आहे त्याची झलक कोणी कधी दाखवली नाही. मात्र मुठ कितीही झाकलेली असली, तरी फ़टीतून थोडे काही दिसत असते आणि मुठ आवळणारा ते दिसणारे अधिकाधिक झाकायचा आटापिटा करीत असतो. प्रियंकाच्या करिष्म्याचे गोडवे गाणार्यांनी आजवर तेच सातत्याने लपवून ठेवलेले आहे. त्यामुळेच प्रियंकाच्या किमयेची थोडी झडती घ्यायला हरकत नसावी. बाकीच्या देशात वा उत्तरप्रदेशात प्रियंका काय चमत्कार करू शकते, ते सोडून द्या. खुद्द अमेठी रायबरेलीत ती काय करू शकली आहे?
लांब जायला नको, गेल्या विधानसभा निवडणूकीत वा इतरवेळी प्रियंकाने सतत त्याच दोन जिल्ह्यात मुक्काम ठोकलेला आहे. तिथे विधानसभेच्या दहा जागा आहेत आणि त्यापैकी किती जागा मुक्काम ठोकल्यावर प्रियंकाने कॉग्रेसला जिंकून दिलेल्या होत्या. २०१२ मतदानात दहापैकी अवघ्या तीन जागा कॉग्रेसला जिंकता आल्या. म्हणजे अमेठी रायबरेली या बालेकिल्ल्यातही प्रियंका कॉग्रेसला सर्व दहा किंवा त्यातल्या निम्मे जागाही जिंकून देऊ शकलेली नव्हती. मग तेव्हा तिचा करिष्मा कोणी डिएक्टीव्हेट केला होता काय? प्रियंकाचे आजवरचे सार्वजनिक दर्शन म्हणजे मुठभर लोकांमध्ये व प्रामुख्याने मुले महिलांच्या घोळक्यात जाऊन गळ्यात हार घालून घेणे, इतकेच राहिले आहे. कुठेतरी त्यांच्याशी संवाद साधायचा आणि पुर्वजांच्या आठवणी सांगायच्या, पलिकडे या तरूणीला मजल मारता आलेली नाही. तीन वर्षापुर्वी या बालेकिल्ल्यालाच सुरूंग लावला गेला, तेव्हा करिष्मा कुठे झोपा काढत होता? गुजरातचा मुख्यमंत्री अमेठीत प्रचाराला आला आणि त्याने स्मृती इराणी नामक उपर्या महिलेला राहुल गांधींच्या विरोधात उभे केले. तेव्हा प्रियंकाचा करिष्मा किती चमत्कार घडवू शकला होता? त्यापुर्वी दोन निवडणूका सहजगत्या लाखो मतांच्या फ़रकाने जिंकणार्या राहुलना, मतमोजणीत दोनतीन फ़ेर्या मागे पडावे लागले आणि किरकोळ फ़रकाने त्यांनी अमेठीची जागा राखलेली होती. तेव्हाही प्रियंका त्याच परिसरात मुक्काम ठोकून होती. आपल्याच बालेकिल्ल्यात मुक्काम ठोकूनही प्रियंका मोदीलाटेत भावाची अब्रु कशीबशी राखू शकली होती. त्यापुर्वी विधानसभेत स्वपक्षाचे दहापैकी पाचसहा आमदारही निवडून आणू शकलेली नव्हती. यालाच कोणी करिष्मा म्हणणार असेल, तर त्यांनी आपल्या ‘नंदनवनात’ खुशाल मजा मारावी. कोणाचे काहीही बिघडणार नाही. प्रियंकामुळे काय फ़रक पडतो, त्याची ही चाहुल आहे.
आणखी एक गोष्ट अशी, की उत्तरप्रदेशात स्वबळावर लढायची सज्जता केलेल्या कॉग्रेसने सहा महिन्यात त्याचा नाद सोडून दिला. समाजवादी पक्षासमोर लोटांगण घालून २५ टक्के जागा पदरात पाडून घेतल्या. थोडक्यात स्वबळावर लढायची हिंमत गमावून बसलेल्या पक्षाला, आता विस्कटलेल्या समाजवादी पक्षाने ४०३ पैकी १०५ जागा भीक म्हणून सोडल्या आहेत. ती भीक मिळवण्यालाच करिष्मा ठरवण्याची केविलवाणी कसरत निष्ठावान नेते व पत्रकार करीत आहेत. त्यामुळे अखिलेशचे काही बिघडत नाही की भाजपाचे काही बिघडणार नाही. अशा मर्कटलिलांचे उत्तर निकालातून मिळत असते. लोकसभेच्या निकालात ते मिळाले आणि त्यानंतरही मिळत राहिलेले आहे. पण सतत थप्पड खाण्याची संवय लागलेल्यांना असल्या बाष्कळ बडबडी करण्याखेरीजही पर्याय नसतो. त्यामुळे त्यांनी प्रियंकाच्या करिष्म्याचे ढोल जरूर वाजवावेत. पण त्यातून ही झाकली मुठ अखेर उघडली जाणार आहे, याचा विसर पडता कामा नये. इथेही आता प्रियंकाच्या तथाकथित करिष्म्याने कॉग्रेस ५० जागा जिंकू शकली तरी खुप आहे. समाजवादी पक्षाच्या कुबड्या आणि प्रियंकाच्या करिष्म्यानेही तितक्या जागा जिंकता आल्या नाहीत, तर आजवर झाकून ठेवलेल्या मुठीचे रहस्य जगाला कळणार असून, उरलासुरला हुकूमाचा पत्ताही निकालात निघणार आहे. राहुलचे अपयश जगाने बघितलेलेच आहे. प्रियंकाही किमया करू शकली नाही, तर नेहरू खानदान पक्षाला यश मिळवून देऊ शकत नाही, यावर कायमचे शिक्कामोर्तब होऊन जाईल. कॉग्रेसमुक्त भारत सोडून द्या. निदान एका खानदानाच्या गुलामीतून कॉग्रेसपक्षाला तरी मुक्ती नक्की मिळून जाईल. किंबहूना तसेच होणार आहे. कारण प्रियंकाच्या करिष्म्याचा फ़ुगा जितका मोठा व अधिक फ़ुगवला जाईल, तितका लौकर फ़ुटण्याची शक्यता अधिक आहे. कारण झाकली मुठ झाकलेली असेपर्यंतच मोलाची असते.
No comments:
Post a Comment