Thursday, January 26, 2017

बेशरमपणाचा ‘आदर्श’

sandeep kumar AAP के लिए चित्र परिणाम

जगाला तुमच्या देशाची ओळख तुमच्या राजधानीतून होत असते. कारण जगभरचे राजकीय नेते वा मान्यवर राजधानीलाच भेट देत असतात. सहाजिकच नवी दिल्ली ही भारताची सर्वात मोठी ओळख आहे. अशा राजधानीच्या महानगराला मागल्या दोन वर्षात उकिरडा व नरक बनवण्याची कर्तबगारी अरविंद केजरीवाल व त्यांच्या आम आदमी पक्षाने करून दाखवली आहे. कारण सतत कुठल्या ना कुठल्या वादामुळे ह्या शहराचे नागरी जीवन किंवा नागरी व्यवस्था पुरती कोसळून पडली आहे. अर्थात तसे काही घडेल याची चाहुल काही प्रमाणात दिल्लीकरांना होती. म्हणूनच लोकसभेत त्या पक्षाला दिल्लीकरांनीच धुळ चारली होती. मात्र भाजपाच्या दिवाळखोरीमुळे पुन्हा झालेल्या मध्यावधी निवडणूकीत लोकांनी केजरीवाल यांना यशस्वी केले. त्याचे कारण हा माणूस वा त्याचा पक्ष उत्तम कारभार करील, अशी अजिबात अपेक्षा नव्हती. पण भाजपाला लोकसभेतील यशानंतर चढलेला माज उतरवण्यासाठीच लोकांनी दिल्ली विधानसभेत भाजपा पराभूत होईल याची काळजी घेतली. त्यातून मिळाले ते यश म्हणजे आपल्या कर्तबगारीवर झालेले शिक्कामोर्तब, असे समजून केजरीवाल यांनी सतत मनमानी चालविली आहे. माणसाचे मानसिक संतुलन बिघडल्यावर कुठल्या थराला बेतालपणा होऊ शकतो, त्याची नवनवी प्रात्यक्षिके घडवण्याचा वसा घेतल्याप्रमाणे हा पक्ष व केजरीवाल वागत राहिले आहेत. म्हणूनच गतवर्षी दिल्लीत रोगराई पसरली, तर यांचे मंत्रीमंडळ दिल्लीतून गायब होते आणि आताच तिथे कचर्‍याचे ढिग साठले असताना, ही मंडळी पंजाब गोव्यात मते मागायला फ़िरत होती. दिल्लीचे हाल खायला कुत्राही जागेवर नव्हता. अशा स्थितीत आता केजरीवाल यांनी निवडणूक आयोगालाही आव्हान देण्यापर्यंत मजल मारली आहे. त्यातून बेशरमपणाचा एक नवा आदर्श निर्माण करण्याचा त्यांनी चंग बांधलेला दिसतो.

आपल्या प्रचारात वा नेहमीच्या बोलण्यात केजरीवाल यांनी बेतालपणा केला नाही, तरच आता लोकांना आश्चर्य वाटेल. कारण आता ती नित्याची बाब बनली आहे., आपण बोलतो तेच सत्य आणि आपण सांगतो तेच पवित्र’ अशा भ्रमाने या लोकांना पछाडले आहे. ज्यांच्या मंत्रीमंडळातील तीन मंत्र्यांना वर्षभरात विविध फ़ौजदारी गुन्ह्यामुळे हाकलावे लागले, त्याने पावित्र्याचा आव आणावा, याला बेशरमपणा संबोधणेही अयोग्य ठरावे. महिला बालकविकास खात्याचा मंत्री, एका गृहीणीला रेशनकार्ड मिळवून देण्याच्या बदल्यात लैंगिक सुखाची अपेक्षा करतो आणि त्याचेही चित्रण करून घेतो. असा माणूस आपल्या पक्षात होता आणि त्याला आमदारकीसह आपण मंत्रीपद दिल्याचा साधा पश्चातापही केजरीवाल यांनी कधी व्यक्त केला नाही. आरंभीच्या कालखंडात उठल्यासुटल्या राजघाटावर महात्माजींच्या समाधी स्थळावर जाऊन मौनव्रत घेणार्‍या केजरीवाल यांनी, संदीपकुमार या मंत्र्याच्या लैंगिक पापानंतर कुठले प्रायश्चीत्त घेतले होते? इतर मिळेल त्या पक्षावर आणि नेत्यांवर आरोपांची राळ उडवणार्‍या या माणसाने, कधी आपले घर साफ़ केले नाही की आपल्या सहकार्‍यांच्या पापाचे प्रायश्चीत्त घेतले नाही. ज्याचे पुरावे समोर आले, त्यासाठी दोन शब्दांची माफ़ी मागण्याचे सौजन्य दाखवले नाही. त्यानेच अन्य राज्यात जाऊन भ्रष्टाचार संपवण्याची भाषा बोलण्याला बेशरपणाची कमाल नाही तर काय म्हणता येईल? अशा केजरीवाल यांनी एका प्रचारसभेत कॉग्रेस वा भाजपा पैसे वाटतील ते घेऊन मते मात्र आम आदमी पक्षाला देण्याचे आवाहन केले. त्यामुळे निवडणूक आयोगाने त्यांना समज दिली. तर हा बेशरम माणूस आयोगालाच शहाणपण शिकवू लागला आहे. इतक्या वर्षात आयोगाला मतदानातला भ्रष्टाचार संपवता आला नाही. आपण तो अशा प्रचारातून संपवत असल्याचा खुलासा त्यांनी केला आहे.

अन्य पक्षांनी दिलेले पैसे घ्या आणि मते मात्र आपल्याला द्या, अशा आवाहनातून भ्रष्टाचार संपू शकतो. म्हणून आयोगाने केजरीवालनाच आपले प्रचारक दूत बनवावे, असेही या महोदयांनी हसत सांगितले आहे. ज्याला आपल्या तीन वर्षे जुन्या कोवळ्या पक्षातला भ्रष्टाचार व अनचार रोखता आला नाही, तो देशातील व निवडणूकातील भ्रष्टाचार संपवणारा दूत होऊ इच्छितो. याला बेशरमपणाचा कळस म्हणावे लागेल. ज्याने दिल्ली सरकारच्या पैशाचा विनोयोग पंजाब व गोव्यातील पक्ष प्रचाराच्या जाहिराती देण्यासाठी केल्याचा आक्षेप घेण्यात आलेला आहे, त्याने असली भाषा बोलण्यासाठी खरेच हिंमत असावी लागते. ‘पुरूष’ या जयवंत दळवी लिखीत नाटकात एक बलात्कारी पुढारी नाना पाटेकरने रंगवला आहे. त्यात बलात्कार केलेल्या मुलीच्या पित्याला तो निवडणूकीत मदतीचे आवाहन करतो. पण तोही म्हणतो, ‘थेट माझ्यासाठी मते मागायला फ़िरा अशी मागणी मी करणार नाही. तितका मी बेशरम नाही’. केजरीवाल त्याही काल्पनिक पात्राच्या पलिकडे गेलेला महाभाग आहे, आपले पाप व गुन्हाच आदर्श असल्याचा दावा त्याने मांडला आहे. कधी न्यायालयाच्या आदेशाला आव्हान द्यायचे, तर कधी निवडणूक आयोगावरच चिखलफ़ेक करावी; असा बेताल उद्योग त्याने सार्वजनिक जीवनात आणलेला आहे. अरूण गवळीसारखा नामचिन गुन्हेगारही मतदानाच्या शर्यतीत उतरला होता. पण त्यानेही परिसरात मते मागताना आपण स्वच्छ चारित्र्याचे व पुण्याचे पुतळे असल्याचा दावा केलेला नाही. पण भामटे, बलात्कारी व भ्रष्टाचारी यांची टोळी बनवून राजकारणात आलेल्या केजरीवाल यांनी, गुन्हेगारांपेक्षाही आपण अधिक बदमाश असल्याचा सिद्धांतच मांडायचा चंग बांधलेला दिसतो. अन्यथा त्याने निवडणूक आयोगाला शहाणपणा शिकवू बघितला नसता. अर्थात पंजाब गोव्याचा मतदार त्याला धडा शिकवीलच.

आगामी विधानसभा मतदानात काय होईल ते दिसेलच. पण ज्या दिल्लीकरांच्या मतांमुळे ह्या मर्कटलिला देशभर प्रतिष्ठा पावलेल्या आहेत, तिथेच केजरीवाल यांना व त्यांच्या टोळीला लौकरच धडा मिळाल्याशिवाय रहाणार नाही. कारण फ़ेब्रुवारी महिन्यात पंजाब गोव्याचे मतदान व्हायचे आहे. त्यानंतर सहा आठवड्यातच आम आदमी पक्षाचा बालेकिल्ला मानल्या जाणार्‍या दिल्लीच्या तीन महापालिकांचे मतदान व्हायचे आहे. तिथे केजरीवाल यांची खरी कसोटी लागणार आहे. एप्रिल महिन्यात तिथे मतदान व्हायचे असताना डिसेंबर जानेवारीत दिल्लीकरांना कचर्‍याच्या ढिगात फ़ेकून त्यांचा मुख्यमंत्री अन्यत्र निघून गेल्याची नाराजी दाखवण्याची तीच पहिली संधी असणार आहे. त्यात दिल्लीकर केजरीवाल यांच्या शब्दाला किंवा पोरकटपणाला धडा शिकवल्याशिवाय रहाणार नाही. अशा पावित्र्याच्या पुतळयाच्या कारभारामुळे उकिरड्यात जगण्यापेक्षा भ्रष्ट कॉग्रेस भाजपाच्या राज्यात अधिक सुखाने जगण्याची इच्छा आज दिल्लीकराला अनावर झालेली आहे. त्यामुळेच पंजाब गोव्याची सैर संपवून माघारी आलेल्या केजरीवाल टोळीला सहा आठवड्यात एप्रिल महिन्यात दिल्लीकरांना सामोरे जायचे आहे. तेव्हा गल्लीबोळ वस्त्यांमध्ये मतदाराकडे ही टोळी कुठल्या तोंडाने मते मागणार आहे? आपण दोन वर्षात दिल्लीला रोगराई दिली. रेशनकार्ड वा अन्य सरकारी सुविधांसाठी लैंगिक शोषण करणारा लिंगपिसाट मंत्री दिला. किंवा रस्त्यावर वस्तीत कचर्‍याचे प्रचंड उकिरडे निर्माण केले. त्यासाठी आपल्याला मते देण्याचे आवाहन केजरीवाल करणार आहेत काय? ‘दो साल केजरीवाल और दिली बेहाल’ अशा स्थितीत सापडलेला दिल्लीकर या टोळीला नेस्तनाबूत केल्याशिवाय रहाणार नाही. तेच त्याचे पहिले कर्तव्य असेल. कारण पालिका मतदानात अशा लोकांना धडा शिकवला, तरच आगामी तीन वर्षात केजरीवाल निदान पुन्हा मते मिळवण्यासाठी दिल्लीत मुक्काम ठोकून काही धड काम करतील.

No comments:

Post a Comment