Wednesday, January 18, 2017

गांधीस्मारक आणि ‘निधी’

MGS nidhi के लिए चित्र परिणाम

खादी ग्रामोद्योग आयोगाच्या दैनंदिनी वा कॅलेन्डरवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे छायाचित्र प्रकाशित झाल्याने मोठे काहूर माजले. त्यात गांधींना पुसण्याचा प्रयास इथपासून मोदींना गांधीवाद किती उमजला आहे, असेही प्रश्न विचारले गेले. जणू आम्हालाच गांधी कळला आहे आणि आम्हीच गांधीचे कार्य पुढे घेऊन चाललो आहोत, असाच एकूण सूर लावला गेला. पण अशा गांधीवादी लोकांनी वास्तवात कुठल्या गांधी व गांधी विचाराचा वारसा पुढे चालवला आहे, त्याचा सहसा उहापोह होत नाही. गांधींचे विचार व कार्य पुढे घेऊन जाण्यासाठी त्यांच्या निधनानंतर काही मोठ्या मंडळींनी एकत्र येऊन गांधी स्मारक निधी नावाची संस्था स्थापन केलेली होती. त्यात पंडीत नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल. चक्रवर्ति राजगोपालाचारी, पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद आणि मौलाना आझाद यांच्या समावेश होता. अर्थात अशा रितीने तत्कालीन सत्ताधारी नेत्यांनी एक संस्था स्थापन केली, तर त्यामध्ये सरकारी तिजोरीतला पैसा ओतला गेला असणार हे वेगळे सांगण्याचीही गरज नाही. अन्य ठिकाणाहून त्यात कोणी देणगी रुपाने भर घातलेलीच असेल, तर त्याचाही उदात्त हेतू गांधीविचार व धोरणांना चालना देण्याचाच असू शकतो. या मोठ्या नेत्यांनी स्मारक निधी ही संस्था स्थापन करताना म्हटले होते, की महात्माजींचे अपुरे राहिलेले कार्य पुर्ण करण्यासाठी ही संस्था उभारायची आहे. सहाजिकच आता ६८ वर्षानंतर या स्मारक निधीने नंतरच्या काळत किती व कोणते अपुरे कार्य तडीस नेले, तेही तपासून बघायला हरकत नव्हती. बाकी कोणी नाही तरी ज्यांना महात्मा वा गांधी या नावाविषयी मोठा उमाळा आहे, त्यांनी अशा गोष्टीत बारकाईने लक्ष घालण्याची गरज होती. ज्यांना गांधींच्या जागी दुसर्‍या कुणाचा फ़ोटो दैनंदिनीत छापून आल्यास उमासे येतात, त्यांना तरी स्मारक निधीविषयी आपुलकी असायला नको काय? त्याचा काय दाखला आहे?

एका फ़ोटोमुळे विचलीत झालेल्यांची संख्या मोठी आहे. पण त्यापैकी कोणी गेल्या ६८ वर्षात गांधी स्मारक निधीची काय अवस्था आहे वा दुर्दशा झालेली आहे; त्याकडे एकदाही ढुंकून बघितलेले नाही. पण जे कोणी या स्मारक निधी संस्थेचे आजचे संचालक वा चालक आहेत, ते कोणते अपुरे कार्य पुर्ण करीत गांधी विचारांचे उदात्तीकरण करतात, त्याची वास्तपुस्तही सध्या बिथरलेल्या कोणा गांधीप्रेमींनी केल्याचे ऐकीवात नाही. सहाजिकच स्मारक निधी म्हणून जे काही उद्योग चालू आहेत, त्यालाच आपण गांधींचे अपुरे राहिलेले कार्य मानायला हवे ना? ते कार्य मोदी करीत नसतील, म्हणूनच हे गांधीप्रेमी बिथरलेले असू शकतात. मोदी उठले आणि महात्माजींचे अपुरे कार्य म्हणून स्वच्छतेच्या मागे लागले. अवघ्या देशाला त्यांनी स्वच्छता मोहिमेच्या कामाला जुंपण्याचा चंग बांधला. ते गांधीचे अपुरे कार्य असल्याचा शोध मोदी नावाच्या माणसाने कुठून लावला? ह्या प्रश्नाने बहुतांश गांधीप्रेमी विचलीत झालेले आहेत. खरेच स्वच्छता हे अपुरे कार्य असते, तर स्मारकनिधी वा तत्सम गांधीवादी संस्थांनी गेल्या सात दशकात तेच काम हाती घेतले असते. देशातली निदान दोनचार हजार गावे तरी स्वच्छ निर्मळ करून दाखवलीच असती. पण तसे कुठलेही गाव किंवा वस्ती गांधीवादी संस्थेने स्वच्छ केल्याचे ऐकीवात नाही. खादीच्या दैनंदिनीचा गदारोळ ज्यांनी केला, त्यांच्याकडेही अशा स्मारकनिधी वा अन्य गांधीप्रेमी संस्थांनी काय केले आहे, त्याचे उत्तर सापडणार नाही. मग महात्म्याचे अपुरे राहिलेले कुठले कार्य अशा संस्था करीत असतात, असा प्रश्न पडतो. त्याचा शोध घेता एक संस्था सापडली. ती आपले वा महात्माजींचे अपुरे राहिलेले कार्य मात्र जोमाने पुढे नेते आहे. तिचे नाव गांधी स्मारक निधी असे आहे. गेल्याच महिन्यात एका कोर्टाच्या निकालामुळे त्या महान कार्याचा शोध लागला. पण त्यावर कुठले काहूर माजले नाही.

नेहरू-कलामांनी जी संस्था १९४९ सालात स्थापन केली, ती गांधी स्मारक निधी. तिचे काम देशव्यापी चालावे अशी अपेक्षा होती. पण तेव्हा प्रांतरचना नव्याने चालू होती. अनेक राज्यात भाषिक प्रांताच्या मागणीची आंदोलने भडकलेली होती. १९६० नंतर महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. तेव्हा स्मारक निधीचे काम विकेंद्रित करण्याचा निर्णय झाला. त्यानुसार दिल्लीतील संस्थेचे विभाजन करून, विविध राज्यातील शाखांना आपापले स्वतंत्र काम करण्याची मुभा देण्यात आली. त्यानुसार महाराष्ट्रातही महाराष्ट्र गांधी स्मारकनिधी ही स्वतंत्र संस्था झाली. गेली काही वर्षे समाजवादी विचारवंत म्हणून ओळखले जाणारे डॉ. कुमार सप्तर्षी या संस्थेने अध्यक्ष आहेत. त्यांच्याच विद्यमाने ही बातमी एका वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाली. म्हणूनच गांधीजींचे अपुरे राहिलेले कार्य कोणते आणि सप्तर्षी कुठले गांधी कार्य पुढे घेऊन चालले आहेत, त्याची कल्पना येऊ शकली. तात्कालीन कॉग्रेसनेते मामा देवगिरीकर यांनी पक्षाची जबाबदारी सोडून राज्यातील स्मारकनिधीची जबाबदारी आपल्या डोक्यावर घेतली होती. त्यासाठी त्यांनी पुण्याजवळचे गाव असलेल्या कोथरूड येथे दहा एकर जमिन संस्थेसाठी खरेदी केली. आता इतक्या वर्षानंतर त्या जमिनीवर कोणते गांधीकार्य तडीस गेले आहे? गांधीभवन नावाची एक वास्तु उभी आहे आणि बाकीच्या जमिनीवर उद्योग व व्यवसाय चालू आहेत. दहापैकी दिड एकर जमिनीवर गांधीभवन उभे आहे आणि बाकीच्या जमिनी खाजगी व्यवसायांना भाड्याने देण्यात आलेल्या आहेत. त्याचे भाडेवसुल करणे, हे मुख्य कार्य झालेले आहे. त्याखेरीज अन्य काही लोकांनीही अतिक्रमण करून जमिन व्यापलेली आहे. त्यांच्या विरोधात विद्यमान चालक खटले व तक्रारी करून राहिले आहेत. हे महात्माजींचे अपुरे राहिलेले कार्य आहे. कुठल्याही जुन्या सरंजामदार जमिनदारापेक्षा त्यात नेमके काय भिन्न असते, हे कोणी सांगेल काय?

काही वर्षापुर्वी ह्या जमिनीची मालकी स्थानिक निधीकडे आलेली होती. पण त्याला २३ वर्षे उलटून गेल्यावर दिल्लीतील स्मारक निधीच्या चालकांना जाग आली, की त्या जमिनीवर मालमत्तेवर हक्क सांगायचे काम ‘अपुरेच’ राहुन गेले आहे. त्यामुळे त्यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आणि दिल्ली व महाराष्ट्रातील गांधी स्मारकनिधी यांच्यात कोर्टबाजी सुरू झाली. ती तब्बल दोन दशकाहून अधिक काळ चालली. महात्मा गांधी हे बॅरीस्टर होते आणि कायदेपंडीतही होते. पण त्यांनी मालमत्तेसाठी किंवा तत्सम कुठल्या हव्यासापोटी, मालमत्तेचे खटले चालवले असे कोणी ऐकले नाही. उलट त्या कालखंडात खोर्‍याने पैसा ओढण्याचा व्यवसाय असूनही त्यांनी कोर्टाकडे पाठ फ़िरवली आणि जनतेच्या जिव्हाळ्याच्या विषयांना हात घालून सार्वजनिक हिताचे न्याय मिळवण्यासाठी आयुष्य खर्ची घातल्याचे म्हणतात. पण तो गांधी आजकालच्या गांधीप्रेमींना वा स्मारकनिधीच्या लोकांना माहितीच नसावा. अन्यथा त्यांनी महात्माजींचे अपुरे राहिलेले कार्य म्हणून आपसात मालमत्ता व भूखंडाच्या मालकीचे खटले कोर्टात जाऊन लढण्यात, दोन दशकाचा कालापव्यय कशाला केला असता? आपण नित्यनेमाने सप्तर्षीना विविध वाहिन्यांवर चर्चेत बघत असतो. पण त्यांनी कधीही महात्म्याच्या ‘अशा अपुर्‍या’ राहिलेल्या कार्याचा उल्लेख केल्याचे ऐकीवात नाही. त्यांच्यासारख्या गांधीप्रेमींच्या लेखी हे खरे गांधीविचार आहेत आणि तेच अपुरे राहिलेले कार्य आहे. ते निकालात काढण्याचे काम जोमाने चालू आहे आणि म्हणूनच महात्म्याच्या नावावर चाललेल्या अशा कज्जेदलालीची बातमी प्रकाशित होऊनही कुणी गांधीप्रेमी विचलीत झाला नाही. मोदींनी असे काही केले असते आणि गांधीसंस्था वा निधी बळकावण्याचा उद्योग केला असता, तर कोणी अवाक्षर बोलले नसते. पण हे निघाले चरखा चालवायला आणि स्वच्छता करायला. हे काय गांधींचे अपुरे राहिलेले कार्य आहे? ते तर सप्तर्षी चालवतात. मालमत्तेवरून परस्परांच्या उरावर बसण्याचे काम हेच महात्माजींचे अपुरे राहिलेले कार्य असते ना?

2 comments:

  1. भाऊ!
    धन्यवाद.
    डॅा. कुमार सप्तर्षि यांच्या कार्याची ओळख करून दिल्याबद्दल.
    सामान्य माणसाला गांधीजींचे कार्य काय ते माहिती असते. पण "गांधीवादी कंपूचे गुप्त कार्य" माहिती नसते.
    तुम्ही आमचे अज्ञान दूर केलेत.

    ReplyDelete
  2. भाऊ!
    धन्यवाद डॉ. सप्तर्षी यांच्या कार्यवर आपण टाकलेला प्रकाश झोत पाहून डोळे उघडले आणि त्यांचे गांधी प्रेम किती "निर्मळ" आहे याची जाणीव हि झाली. आणि हा माणूस वृत्तवाहिन्यावर येऊन मोदी विरोधात का मते मांडत असतो याचा खुलासा पण झाला

    ReplyDelete