दुसर्या महायुद्धाच्या ज्या मनोरंजक कहाण्या सांगितल्या जातात, त्यात डेझर्ट फ़ॉक्स नावाची एक गोष्ट आहे. हिटलरच्या आक्रमक पवित्र्यामुळे अवघे जग युद्धात ओढले गेले. त्यात आफ़्रिका खंडात धुमाकुळ घालणारा हिटलरचा सेनानी जनरल रोमेल खुप गाजला होता. कारण हाताशी असलेल्या किमान सेनेच्या बळावर त्याने अनेकांना पाणी पाजलेले होते. त्याची युद्धनिती अतिशय सोपी होती. तो टेहेळणी करणार्यांना हुलकवणी देऊन हल्ले ओढवून घ्यायचा आणि जिथे असा हल्ला होई, तिथे प्रत्यक्षात जर्मन सेनेचे काहीच नसायचे. त्यामुळे प्रतिस्पर्धी सेनेचा दारूगोळा व युद्धसाहित्याची अकारण नासाडी होत असे. मग रोमेल त्यांना अडचणीत गाठून ठोकायचा. थोडक्यात जिथे हल्ला करण्यासारखे काहीच नाही, तिथे हल्लागुल्ला माजवण्याचे नाटक; हे रोमेलचे युद्धतंत्र होते. हल्ली तथाकथित शहाण्यांनी असेच काही तंत्र लोकांना उल्लू बनवण्यासाठी हाताळलेले असावे. अन्यथा नसलेल्या विषयावर कल्लोळ कशाला माजवला गेला असता? शरद यादव आणि विनय कटीयार नावाच्या दोन नेत्यांनी महिलांचा घोर अवमान केला, म्हणून बुधवारी विविध वाहिन्यांवर चाललेला गदारोळ असाच फ़सवा होता. काय तर म्हणे या दोघांनी महिलांची अवहेलना करणारी विधाने केली. त्यासाठी त्यांनी माफ़ी मागितली पाहिजे. खरेच त्यांनी माफ़ी मागितल्याने भारतातल्या महिलांची प्रतिष्ठा सुरक्षित रहाणार आहे काय? किंबहूना अशा कोणा फ़ुटकळ लोकांनी उच्चारलेल्या काही शब्दांनी भारतातील मुली महिलांची अब्रु धोक्यात आलेली आहे काय? नसेल तर त्यावरून इतका गदारोळ कशासाठी माजवला जातो आहे? दुसरी गोष्ट अशा माफ़ी मागण्याने महिलांना खरेच सुरक्षित वाटू लागणार आहे काय? ज्या देशात प्रतिदिन हजारोच्या संख्येने महिलांवर अन्याय व अत्याचार होत असतात, तिथे अशा दिखावू मानसन्मानाचा बडेजाव, ही निव्वळ भामटेगिरीच नाही काय?
काही वर्षापुर्वी सातारा येथील एका संस्थेमध्ये महिलांच्या लैंगिक शोषणाचा प्रकार उघडकीस आला. त्यात एक थोर समाजसेवक गुंतलेले होते. काही महिन्यांपुर्वी दिल्लीत केजरीवाल यांच्या एका मंत्र्यानेच रेशनकार्ड मिळवून देण्यासाठी गृहीणीचे लैंगिक शोषण केल्याचा प्रकार उघडकीस आला. दिल्लीत निर्भया प्रकरणाने सामुहिक बलात्कार ही भीषण घटना घडलेली होती. महाराष्ट्रात कुठल्याही खेड्यात दलित वा महिलेवर अत्याचार झाल्याच्या घटना वारंवार घडत असतात. त्यांना कुठला न्याय आजवर मिळू शकला आहे? त्यावरून कितीकाळ गदारोळ करण्यात आला? असे विषय जेव्हा पटलावर येतात, तेव्हा ताजेपणाच्या फ़ोडण्या देऊन गाजावाजा केला जातो. पण पुढे काहीही होत नाही. मात्र तात्पुरता गदारोळ खुप करता येतो. तेवढ्यापुरते हे प्रसंग वा घटना चविष्ठ म्हणून वापरल्या जातात आणि नंतर त्याकडे साफ़ पाठ फ़िरवली जाते. कोपर्डीच्या घटनेने कोणाच्याही अंगावर शहारे आले असते. पण दिर्घकाळ त्याची बातमी कोणी गाजवली नाही. अखेर त्याची प्रतिक्रीया म्हणून मराठा मोर्चे निघू लागले आणि त्याच्या बातम्या रंगल्या. त्यामागची वेदना सामुहिक बलात्कार व नंतर त्या मुलीची हत्या अशीच होती. त्यासाठी कोणाकडे माफ़ीची मागणी झाली होती? आणि कोणाच्या माफ़ी मागण्याने नंतरच्या घटना थांबल्या होत्या? एकूणच असे विषय प्रतिदिन शेकडो मुलींना कायमचे अंधारात घेऊन जातात. त्यांच्या वेदना यातनांचे राजकीय वा माध्यमातील भांडवल खुप केले जाते. पण त्याचा कायमचा निचरा करण्यासाठी काहीही होत नाही. शरद यादव वा कटियार यांच्या वादग्रस्त विधानांचा गाजावाजा होतो, त्याच्या लाखो पटीने अशा पिडीत मुलींचे आयुष्य मोलाचे आहे. त्यांच्या वेदना अधिक भयंकर आहेत. त्यावर कायमस्वरूपी उपाय शोधण्याचा किती ठामपणे प्रयास झाला आहे? नसेल तर कशाला होत नाही?
आता अशी शंका येऊ लागली आहे, की महिलांची प्रतिष्ठा किंवा सन्मान हा निव्वळ नाटक रंगवण्याचा विषय होऊन बसला आहे. किंबहूना खर्या वेदना व यातनांवरचे लक्ष उडवण्यासाठी, अशा गोष्टी भडक करून गाजवल्या जातात. जेणेकरून खर्या वेदनांकडे लक्ष जाऊच नये. यादव काय म्हणाले वा कटियार यांनी काय उदगार काढले, त्याने महिलांना कुठलीही यातना पोहोचलेली नाही. किंबहूना ज्या महिला अशा विषयात आक्रोश करीत आहेत, त्यांनी खर्या पिडीत महिलांच्या वेदनांची किती दखल आजवर घेतलेली आहे? निर्भयाच्या निमीत्ताने नाटक छान रंगले. पण बलात्कार करणार्याला फ़ाशी देण्याची वा कमी वयातला म्हणून सूट नाकारण्याची कायदेशीर तरतुद होऊ शकली नाही. त्यासाठी यापैकी कितीजणांनी आवाज उठवला होता? जालिकटूसाठी ठाण मांडून बसल्यानंतर सरकार व कायद्यालाही नतमस्तक व्हावेच लागलेले आहे. मग महिलांच्या प्रतिष्ठा व सन्मानासाठी असे ठाण मांडून किती लोकांनी आंदोलन केलेले आहे? जे कोणी आज कटियार व यादवांच्या विरोधात बोंबा ठोकत आहेत, त्यापैकी कितीजणांनी त्याला जनआंदोलन बनवण्यासाठी कंबर कसली आहे? उलट तेवढ्यापुरता आक्रोश रंगवला की विषय गुंडाळला जातो. कटीयार वा यादव अशांनी माफ़ी मागण्याचा आग्रह धरला जातो. जणू त्यांनी माफ़ी मागितली मग तमाम महिलांना सुरक्षा मिळेल असाच एक आभास उभा केला जातो. वास्तवात हीच एक भीषण फ़सवणूक झालेली आहे. खरेच तुम्हाला अशा विषयात आस्था असेल तर यादव, कटीयार किंवा लैंगिक शोषण प्रकरणात फ़सलेल्या केजरीवाल यांच्या मंत्र्याला धडा शिकवणे माध्यमांच्याही हाती आहे. कधी तसा विचार तरी केला आहे काय? अशा कुठल्याही पक्षाच्या नेत्याने वा मंत्र्याने अपराध केला असेल, तर त्या पक्षाच्या सर्व कार्यक्रम वा आमंत्रणाकडे माध्यमांना पाठ फ़िरवता येऊ शकले.
प्रसार माध्यमांची कुवत व क्षमता आज इतकी मोठी झाली आहे, की एखाद्या पक्षावर किंवा त्यांच्या कार्यक्रमावर माध्यमांनी बहिष्कार घोषित केला, तरी खुप काही साध्य केले जाऊ शकते. अशा विषयात पांडित्य सांगणार्यांनी एकजुटीने उभे रहायचे ठरवले, तर कुठल्याही महिलाविषयक गुन्ह्याला कठोर शिक्षा देण्याच्या तरतुदीला चालना मिळू शकेल. जो कोणी अशा क्ठोर शिक्षेच्या विरोधात बोलेल, त्यालाच बहिष्कृत करण्याचा पवित्रा माध्यमे घेऊ शकतात आणि त्यांनी पुढाकार घेतला म्हणजे त्यात आपोआप महिला संघटना व अन्य सामान्य संस्थाही उतरू शकतात. कठोर शिक्षा हाच महिलांविषयक गुन्ह्याचा एकमेव उपाय आहे. त्याच्या जोडीला महिलांच्या बाबतीत अपमानास्पद वा पक्षपाती लैंगिक मतप्रदर्शन करणार्यांवर सार्वत्रिक बहिष्कार; हे आणखी एक प्रभावी हत्यार होऊ शकते. त्यासाठी मनाचा मोठा निग्रह करावा लागेल. नफ़ातोटा याकडे पाठ फ़िरवून त्याचे अनुसरण करावे लागेल. अनेकांचा रोष पत्करावा लागेल. त्यासाठी ज्यांची तयारी नसते, त्यांना नुसती धमाल उडवून माफ़ी मागण्याचे नाटक रंगवता येते. कारण त्यातून काहीही साध्य होत नसले, तरी सुरक्षेचा व महिलांच्या सन्मानाचा देखावा उभा करता येत असतो. ज्या देशात प्रतिदिन हजारो महिलांची अवहेलना नित्यनेमाने होत असते आणि त्याची कुठलाही कायदा दखलही घेत नाही; त्याच देशात अशा किरकोळ शब्दांची लढाई रंगवून महिलांच्या प्रतिष्ठेचे देखावे उभे करण्यातला दांभिकपणा आता लपून राहिलेला नाही. मामला थंडा पडल्यावर आरोपी व फ़िर्यादी एकत्र गुण्यागोविंदाने नांदत असतात. बिचारा पिडीत कुठल्या तरी अंधारात खुरडत आपल्या विस्कटलेल्या उध्वस्त आयुष्याची ठिगळे जोडण्य़ाची कसरत करत असतो. हे पराचा कावळा करून कावकाव करणे अधिकाधिक यातनामय होत चालले आहे.
No comments:
Post a Comment