Sunday, January 22, 2017

कॉग्रेसमुक्तीचे दुसरे पर्व

modi mukherjee के लिए चित्र परिणाम

येत्या दोन महिन्यात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूका होत असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी ही २०१४ नंतरची सर्वात मोठी कसोटी आहे. कारण यामध्ये उत्तरप्रदेश ह्या देशातील सर्वात मोठ्या राज्याचा समावेश आहे. लोकसभा लढवताना मोदींनी दोन जागा लढवल्या व दोन्ही जिंकल्या होत्या. त्यापैकी एक उत्तरप्रदेशात वाराणशीची होती, तर दुसरी गुजरातमध्ये बडोद्याची होती. त्या दोन्ही जिंकल्यावर त्यांनी बडोदा सोडला आणि वाराणशी राखून ठेवला. त्यातून त्यांनी एकच संदेश दिला, की यापुढे आपण उत्तरप्रदेशला आपली कर्मभूमी मानलेले आहे. त्यामुळेच आता त्यांचे राज्य म्हणून तिथे बहूमत मिळवून भाजपाचे सरकार सत्तेत आणणे मोदींची व्यक्तीगत जबाबदारी आहे. ती नैतिक जबाबदारी आहेच, पण दोन वर्षानंतर येणार्‍या सतराव्या लोकसभेतील यशाची मुहूर्तमेढ तिथूनच रोवली जाणार आहे. कारण हे राज्य भाजपाला सर्वाधिक खासदार देणारे असून, त्यामुळेच स्वबळावर एकपक्षीय बहूमताचा पल्ला गाठता आलेला होता. तितकेच शेजारचे छोटे उत्तराखंड राज्यही मोदींना जिंकणे भाग आहे. कारण पुर्वाश्रमीचा तो उत्तरप्रदेशचाच भाग आहे. पण मध्यंतरी तिथे जे फ़ाटाफ़ुटीचे राजकारण झाले, त्यात कोर्टाकडून कॉग्रेसला तोंड लपवून अब्रु झाकण्याची संधी मिळून गेलेली आहे. अधिक केंद्राकडून हस्तक्षेप झाल्याचा आरोपही मोदी सरकारवर लागलेला होता. उत्तराखंडात बहूमताने सत्ता आणली, तरच तो आरोप धुतला जाणार आहे. पण त्यात मोठी अडचण दिसत नाही. पुर्वापार हे राज्य सत्तांतर घडवित आलेले असून, यावेळी भाजपाने जिंकण्याची वेळ आहे. शिवाय तिथे कॉग्रेसनेच आपल्या पायावर कुर्‍हाड मारून घेतलेली आहे. सहाजिकच उत्तराखंड जिंकण्यासाठी मोदींना फ़ारसे प्रयास करावे लागणार नाहीत. पण उत्तरप्रदेश मात्र कष्टाचे काम आहे. लोकसभेत बाजी मारली त्याची पुनरावृत्ती करावी लागणार आहे.

अर्थात गेल्या खेपेस जितके अवघड काम होते, तितकी आज भाजपाची स्थिती तिथे वाईट अजिबात नाही. पाच वर्षापुर्वी उत्तरप्रदेशातील भाजपाला नेत्याच्या बेबनावाने बेजार केलेले होते. आज तशी स्थिती अजिबात नाही. उलट नेत्यांच्या साठमारीला तिथे वावच राहिलेला नाही. किंबहूना प्रस्थापित असे कोणीही भाजपा नेते तिथे आज उरलेले नाहीत. दोन राज्यपाल होऊन दूर गेले आहेत आणि बाकीच्यांना केंद्रात सामावून घेण्यात आलेले आहे. त्यामुळे नव्या चेहर्‍याला वा नेतृत्वाला तिथे पुढे आणणे शक्य आहे. तो कोण असेल, ते नंतर बघता येईल. पण याक्षणी मोदी हेच उत्तरप्रदेशचे सर्वात उंच नेता आहेत. अगदी मुलायम, मायावती वा राहुल सोनियापेक्षाही मोदी या नावाला त्या राज्यात अधिक प्रतिसाद मिळतो आहे. वाराणशीत उभे राहून त्यांनी जे धाडस केलेले होते, त्यातून त्यांनी उत्तरप्रदेश तेव्हाच जिंकला होता. आता त्यांनी गुजरातप्रमाणे उत्तरप्रदेशला आधुनिक राज्य बनवण्याचा चंग बांधला, तर लोक अन्य कुठलाही विचार करणार नाहीत. कारण दिर्घकाळानंतर पुन्हा उत्तरप्रदेशला देशाचे पंतप्रधान देण्याचा विक्रम त्याच मोदींच्या नावे जमा झालेला आहे. योगायोगही चांगला दिसतो आहे. सत्तेत असलेल्या मुलायमच्या समाजवादी पक्षात फ़ुट पडलेली आहे आणि मायावतींच्या पक्षाला कधीच गळती लागलेली आहे. उरलेला तिसरा पक्ष कॉग्रेस असलेल्या जागाही टिकवू शकणार नाही, इतका नामशेष करण्याचे काम खुद्द राहुल गांधींनीच हाती घेतलेले आहे. सहाजिकच मोदींसारख्या धुरंधर राजकारण्याला उत्तरप्रदेश काबीज करण्याचे काम सोपे होऊन गेलेले आहे. पण मोदी कुठलेही काम सोपे म्हणून आळस करणार्‍यापैकी नाहीत. आधीच त्यांनी चार मोठ्या सभा घेऊन झाल्या आहेत आणि प्रचाराची रणधुमाळी सुरू झाल्यावर, हा धाडसी नेता प्रचाराचे रान उठवल्याशिवाय रहाणार नाही. कारण नुसते बहूमत हे मोदींचे लक्ष्य असूच शकत नाही.

याक्षणी उत्तरप्रदेशात मोदी सहज बहूमताचा पल्ला गाठू शकतात. कारण समाजवादी पक्ष फ़ुटला आहे आणि त्यापैकी एका गटाशी आघाडी करीत कॉग्रेसने पराभव आताच मान्य केलेला आहे. अखिलेश व कॉग्रेस यांनी हातमिळवणी करण्याचे तेच कारण आहे. दोन्ही पक्षांची लोकसभेतील मते आणि समोर आलेल्या मतचाचण्यांची मते बघितली; तर बेरीज करूनही भाजपापेक्षा कमीच आहेत. त्यामुळे प्रचारापुर्वीच भाजपाचे पारडे जड असल्याची ग्वाहीच मिळालेली आहे. अशा स्थितीत आपण बहूमत व सत्ता मिळवतो, हे मोदी जाणून आहेत. पण तेवढ्याने पुढल्या लोकसभेची बेगमी होत नाही. गेल्या लोकसभेत मिळवलेल्या ८०पैकी ७१ जागांच्या तुलनेत ३०० पर्यंत आमदारांची मजल मारण्याचे ध्येय घेऊनच मोदी मैदानात उतरतील यात शंका नाही. तितका पल्ला गाठला गेला नाही, तरी अडिचशेच्या पुढे पल्ला गाठला तरी त्यात आजवरचे तिन्ही प्रस्थापित पक्ष पुरते भूईसपाट होऊन जातात. तसे झाले तर राष्ट्रपती निवडणूकीत मोदी वा भाजपाचे पारडे आपोआप जड होते. नोटाबंदी वा अन्य निर्णयावर लोक मतदान करतील अशी चर्चा आधीच सुरू झालेली आहे. त्यामुळे आपल्या निर्णयाचे समर्थन लोकांनी किती जोरदार केले, हे दाखवून देण्याची संधी मोदी साधणारच. जेव्हा हा माणुस जिद्दीला पेटून मैदानात उतरतो, तेव्हा त्याच्या झंजावाताला सामोरे जाण्याची कुवत अलिकडल्या काळात अन्य कोणी नेता दाखवू शकलेला नाही. अनेक कारणाने ही विधानसभा निवडणूक मोदींसाठी प्रतिष्ठेची आहे. त्यामुळे नुसते बहूमत हे त्यांचे उद्दिष्ट असू शकत नाही. मात्र त्यांच्या मोठ्या लक्ष्याला पुरक असे डावपेच अन्य पक्ष खेळत असल्याने, मोदींना इतका मोठा पल्ला गाठण्यास मदत नक्कीच होणार आहे. तसे झाले तर लोकसभेनंतरचे पुढले पर्व सुरू होऊ शकेल. आज चवताळलेल्या अनेक पक्ष व नेत्यांचा आवाज व नूर बदलून जाईल.

उत्तरप्रदेशात मोदींनी बहूमताच्या पलिकडे जाऊन तिनशेचा पल्ला गाठणारी झेप घेतली; तर मुलायम, मायावती पुरते नरम पडतील आणि त्यांना राज्यसभेतही मोदींना सहकार्य करणे भाग पडू शकेल. कॉग्रेस आणखी दुबळी होऊन त्या पक्षात उलथापालथींना वेग येऊ शकेल. नेहरू खानदानामुळे पक्ष जिंकतो, या समजूतीला निर्णायक धक्का बसलेला असेल. पण त्याच्याहीपेक्षा मोठी गोष्ट म्हणजे संसदेत धुमाकुळ घालणार्‍यांना वेसण घातली जाईल. संसदेत धुमाकुळ घातल्याने मते मिळत नाहीत आणि उलट मोदींची लोकप्रियता वाढते, असे त्यातून सिद्ध होणार आहे. त्याच्या परिणामी संसदेत गतिरोध निर्माण करणार्‍या अनेक पक्षांना कॉग्रेसची संगत सोडून कामकाजात लक्ष घालावे लागेल. राष्ट्रहिताच्या विषयात मोदी सरकारशी सहकार्याचा पवित्रा घ्यावा लागेल. त्याचा एकत्रित परिणाम राष्ट्रपतीच्या निवडीवर होऊ शकतो. अन्य कुणाच्या मताची पर्वा केल्याशिवाय मोदी भाजपाच्या भूमिकेला दाद देणारी कोणीही व्यक्ती राष्ट्रपतीपदी बसवू शकतील. कारण विरोधातला उमेदवार उभा करण्याची हिंमतही कॉग्रेस वा अन्य पक्ष गमावून बसतील. तो मोदींच्या राजकारणाचा निर्णायक विजय असेल. लोकसभेत बहूमत मिळवल्यानंतरही त्यांना जो विरोध वा अडवणूक होत राहिली, ती कोंडी फ़ुटण्याचा मार्ग म्हणजे उत्तरप्रदेशात निर्णायक प्रचंड बहूमत संपादन करून, अन्य पक्षांच धुव्वा उडवणे असाच आहे. तेच मोदींने लक्ष्य असणार आहे. एका राज्याची सत्ता इतकेच मोदींसाठी उत्तरप्रदेशचे मतदान मोलाचे नाही. तर देशातील राजकारणाचा चेहरामोहरा बदलून टाकणारी निवडणूक; अशी ही लढाई आहे. कॉग्रेसमुक्त नंतर पुरोगामीमुक्त भारताची ती सुरूवात असू शकेल. म्हणूनच त्यातले म्होरके बोलके संपवंण्याला लक्ष्य मानावे लागते. हे बोलून न दाखवणारे मोदी, प्रत्यक्षात त्याच दिशेने वाटचाल करीत आहेत. दोन महिन्यांनी त्याचे प्रत्यंतर येईल. कारण कॉग्रेसमुक्तीचे हे दुसरे पर्व आहे.


4 comments:

  1. छानच,बरोबर भाऊ

    ReplyDelete
  2. जर मोदि स्वबळावर सत्ता आणू शकले नाही तर काय होईल हयाच्यावर प्रकाश टाकावा

    ReplyDelete
  3. ..Bhau Atyant sahi vishleshan..
    Modi nakkich prachar sabhechi randhumali majavtil tyacha phayda hone apekshit aahe..
    Modi ni tya aadhi Maharashtrat pan prachar jordar kela hota ani BJP sarvat motha paksh sene shi takkar devun aala hota.
    Bihar madhye pan aashich randhumali majawali hoti.. Pan tithe Modi ni prachar sabhela prachand gardi jamavali hoti...
    Parantu Bihar madhye nirnayak parabhav swikarav lagala hota..yache vishleshan swatah Modi ni va BJP chya think tank ne kitpat kele aahe ya var BJP che nidan UP madhil yash avalambun aahe ...
    1.Media BJP chya lallu pallu netane pan keleli statements kashi Modi Virodhat phiravato
    2.tasech sthanik neta mhanun kon prabhav padto
    3. Jati Dharmache rajkaran kase phirate
    4. Ramlalla aajhi sthanik bhavanik matdara chya var prabhav padto ki vikas karnyache apeal kam karte ?
    Yavar barech kahi avalambun aahe..
    Nahitar parat Bihar pramane pradeshik netya pudhe matdar BJP kade path phiravato?
    Ki Modi keval gardi jamavtat aani electronic voting machine dware nokar shaha phije tya paksha kade mate phiravato?

    yawar avalambun aahe...
    Modi ni Bihar madhye vikasache rajkaran va spl. package che aamish bihari jantela dakhavale.. parantu sthanik ani jatiya rajkarnane baji marli .....
    Yatun Modi ani BJP think tank ne dhada ghetlela disat nahi...
    Rajnath sing kiva tya sarkha mukhya mantri pada cha umedwar mhanun BJP kiman 6 mahine aadhi declare karel aase vatle hote pan kahi zale nahi..
    Tasech Uttar Pradesh hech Rajyasabhetil BJP chya prashnache uttar aahe he samanya UP matdara la Modi kase patvun detat he pan pahave lagel...
    UP che vote he parat ekda Rajya Sabhitil Modi la vote aahe he patavane va UP election la rashtriya mahatva aahe he jatiya ani dharmik votar la kase patvayche he ek avhan aahe.
    Karan vikalela media he jantela kadhich patvun denar nahi.. Parantu Modi aaplya prabhavi Bhashan shaili ne kase UP la patavtat he pahave lagel..
    Owesi factor kay karto (tyacha Modi kasa samachar gheun baji paltavtat) he pan pahane romanchak tharel..
    Aaj tari varil muddya var BJp ne kaahi kele nahi...
    Amool

    ReplyDelete