Sunday, January 29, 2017

कॉग्रेसच्या जागी भाजपा

congress BJP cartoon के लिए चित्र परिणाम

युती संपल्यानंतर शनिवारी भाजपाने जोरदार सभा घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. पण जसजसे दिवस मागे पडत आहेत, तसतसे मुंबईचे राजकीय चित्र वेगाने साफ़ होऊ लागले आहे. त्यात मुंबईमध्ये आजवर जी लढत कॉग्रेस विरुद्ध शिवसेना अशी होत असे, ती बदलून आता शिवसेना व भाजपा हेच प्रमुख प्रतिस्पर्धी होत असल्याचे दिसू लागले आहे. कॉग्रेसमध्ये गेली अनेक वर्षे अध्यक्ष संजय निरूपम व माजी अध्यक्ष गुरूदास कामत यांच्यात भांडण जुंपलेले आहे. तसे हे भांडण नवे नाही. गेल्या महापालिका निवडणूकीच्या वेळीही अशीच स्थिती उदभवली होती. तेव्हा कृपाशंकर सिंग हे मुंबई कॉग्रेसचे अध्यक्ष होते आणि त्यांच्या कारकिर्दीत मुंबईत मराठी कॉग्रेस कार्यकर्त्यांची कुचंबणा केली जाते; असेच आरोप झालेले होते. पण त्या तक्रारीची दिल्लीकर श्रेष्ठींनी कधी दखल घेतलेली नव्हती. म्हणुनच कृपाशंकर यांची अरेरावी चालू शकली. त्याचा कडेलोट मुंबई महापालिकेच्या निवडणूकीत झालेला होता. पालिकेची उमेदवारी देताना कटाक्षाने मराठीबहूल भागातही उत्तर भारतीय उमेदवारांनाच प्राधान्य दिले गेले. म्हणून खडाजंगी झालेली होती. बंडखोरीही झालेली होती. त्या काळात कामत यांचे निकटवर्ति मानले जाणारे अजित सावंत यांनी खुलेआम तसा आरोप करून बंड पुकारले होते. त्यानी उमेदवारी केली नाही, तरी कृपाशंकर यांच्या मराठीद्वेषाचा मुखवटा फ़ाडलेला होता. सहाजिकच शिवसेनेचे कौतुक नसलेले पण मराठी अस्मितेला जपणारे अनेक कॉग्रेस मतदार सेनेकडे वळलेले होते. अशावेळी मराठी भावना जपण्यापेक्षा कृपाशंकर यांनी अरेरावी केलेली होती आणि त्याच्या परिणामीच शिवसेनेला मराठी एकगठ्ठा मते मिळायला मदत झालेली होती. लोकसभा व विधानसभेत मनसेमुळे फ़टका बसलेल्या सेना-भाजपा युतीला त्यामुळे पालिकेत चांगल्या जागा मिळू शकल्या होत्या.

त्याही आधीच्या लोकसभा मतदानात मनसेने नव्याने उमेदवारी केलेली होती आणि त्याचा मोठा फ़टका शिवसेनेला बसलेला होता. अनेक भागात सेनेची मतविभागणी होऊन मनसेला गेलेल्या मतांनी सेनेचा उमेदवार दुबळा केलेला होता. विधानसभेतही अशीच मराठी मतांची दुफ़ळी होऊन कॉग्रेसला मोठे यश संपादन करता आले होते. त्याचे खरे श्रेय मनसेला होते. पण जिंकलेल्या जागांच्या संख्येवर कॉग्रेसला वा कृपाशंकर यांना आपण मुंबईचे अनभिषीक्त सम्राट झाल्यासारखे भासू लागले. म्हणूनच त्यांनी मुंबई कॉग्रेसमध्ये जे कोणी मराठी अस्मितेची भाषा बोलत होते, त्यांना खड्यासारखे बाजूला करून अमराठी वा उत्तर भारतीय उमेदवारांची वर्णी लावलेली होती. तिथेच कृपाशंकर थांबले नाहीत. त्यांनी प्रचारामध्ये मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना उतरवले आणि त्यांनी तर शिवसेनेच्या हातात कोलितच दिलेले होते. शिवसेनेचे नामोनिशाण पालिका निवडणूकीनंतर शिल्लक उरणार नाही, अशी अर्वाच्च भाषा चव्हाणांनी बोलल्याने नाराजीची प्रतिक्रीया उमटली तिचा शिवसेनेला फ़ायदाच झाला. दादर हा सेनेचा खरा बालेकिल्ला! तिथला बहुतांश मराठी मतदार मनसेच्या आहारी गेलेला असतानाही शिवसेनेला मुंबईत अन्यत्र मोठ्या संख्येने नगरसेवक निवडून आणता आले. त्याचे श्रेय उद्धव ठाकरे यांना मिळाले. कारण तेव्हाच्या लोकसभा वा विधानसभा मतदानातील अपयशाचे खापर त्यांच्याच माथी फ़ोडले गेलेले होते. पण हे यश उद्धव यांच्यापेक्षा कृपाशंकर व चव्हाण यांच्या शिवसेना विरोधी भूमिकेमुळे उद्धवच्या पदरात पडलेले होते. शिवसेनेचे मुंबईतील अस्तित्व पुसण्याच्या आक्रमक पवित्र्याला मुंबईकराचे दिलेले ते चोख उत्तर होते. त्यात मनसेने केलेल्या मतविभागणीचाही अडथळा येऊ शकलेला नव्हता. युती म्हणून सेना भाजपाला १०५ जागा जिंकता आल्या असताना, मनसेनेही २९ नगरसेवक मिळवले होते.

इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की मनसेने मुंबईत शिवसेनेची भरपूर मते फ़ोडली असतानाही पुन्हा पालिकेत शिवसेनेची सत्ता आलेली होती. त्याला उद्धव ठाकरे वा अगदी बाळासाहेब कारणीभूत नव्हते; इतके त्याचे श्रेय कृपाशंकर व पृथ्वीराज चव्हाण यांचे होते. कारण त्यांनी निवडणूक प्रचारात शिवसेनेचे नामोनिशाण पुसण्याच्या वल्गना केलेल्या होत्या. तशीच काहीशी भाषा १९८५ सालात मुरली देवरा यांनी केलेली होती आणि आज तीच भाषा आशिष शेलार व भाजपाही करतो आहे. शिवसेना हा राजकीय पक्ष असण्यापेक्षाही मुंबईच्या मराठी माणसाच्या अस्मितेचे ते प्रतिक झालेले आहे. म्हणूनच शिवसेनेचे नामोनिशाण संपवण्याची भाषा जेव्हा तावातावाने बोलली जाते; तेव्हा सेनेला त्याचा अधिक लाभ होत राहिला आहे. आता मुंबईत सेनेला संपवायची भाषा भाजपा करतो आहे आणि दुसरीकडे कॉग्रेस पक्षातही मराठी-अमराठी वाद भडकलेला आहे. त्यातून नेमकी १९८५ वा २०१२ सालच्या स्थितीची पुनरावृत्ती होते आहे. आज त्या मराठी बाण्याला आव्हान दिल्याप्रमाणे भाजपा बोलत असेल, तर त्याचे परिणाम काय संभवू शकतील? स्थिती बदलली आहे, असे बोलणे खुप सोपे असते. पण मनसेने मतविभागणी केली असतानाही सेनेने ७५ जागा जिंकल्या होत्या आणि आज तर मनसेचीही मते विधानसभेपासून पुन्हा सेनेकडे परतलेली आहेत. त्यात पुन्हा कॉग्रेसमधील मराठी कार्यकर्ता व नेतेही सेनेकडे झुकत असतील, तर मुंबईची मनस्थिती कशी आहे, त्याचा अंदाज येऊ शकतो. उद्या त्याचा लाभ शिवसेनेला निकालातून दिसला, तर श्रेय अर्थातच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वालाच दिले जाईल. पण त्याचा खरे मानकरी आशिष शेलार व किरीट सोमय्या यांच्या पाठोपाठ संजय निरूपम हेच असतील. कारण दोनतीन दशकांपुर्वी मराठी अस्मितेचे प्रतिक असलेली शिवसेना आता मुंबईकरांची अस्मिता झालेली आहे.

शिवसेना मुंबई पालिकेची सत्ता स्वबळावर मिळवू शकणार किंवा नाही; असा प्रश्न विचारला जात आहे. पण गेल्या वेळी सेनेचा प्रमुख प्रतिस्पर्धी कॉग्रेस होती. आज कॉग्रेस या शर्यतीमध्ये कुठेही शिल्लक उरलेली नाही. राज्यात वा केंद्रातला दिर्घकालीन सत्ताधीश कॉग्रेसच होती आणि मुंबईतला सेनेचा प्रतिस्पर्धीही कॉग्रेसच होती. आज तीच जागा भाजपाने घेतलेली असेल, तर शिवसेनेचा मुंबईतला तोच प्रमुख प्रतिस्पर्धी होतो. त्याच्याशी युती वा हातमिळवणी करण्याने असलेली शिवसेना आपले अस्तित्वच संपवून बसली असती. यावेळी जो राजकीय बदल आहे, तो कॉग्रेस व भाजपाच्या जागा बदलल्याने होणार आहे. सेनेने कॉग्रेसला सत्तेपासून दूर ठेवायचे नसून भाजपाला मुंबई काबीज करण्यापासून रोखायचे आहे. भाजपा हा महाराष्ट्राच्या राजकारणातही क्रमाक्रमाने कॉग्रेसची जागा व्यापत चाललेला आहे. त्याच्याशी दोन हात करू शकेल, असाच पक्ष महाराष्ट्राला वा मुंबईला राजकीय पर्याय देऊ शकतो. म्हणूनही युतीला राजकीय अर्थ वा संदर्भ शिल्लक राहिलेला नाही. लोकसभा विधानसभा मतदानानंतर कॉग्रेस वा राष्ट्रवादी पक्ष निकालात निघालेले आहेत. खरे दोनच स्पर्धक शिल्लक आहेत. त्यांनीच हातमिळवणी केल्यास लोकांना तिसरा अन्य पर्याय शोधावा लागेल, किंवा निर्माण करावा लागेल. तसे नको असेल, तर युतीतील एका पक्षाने बाजूला होऊन सत्तेला पर्याय होऊन उभे ठाकणे अगत्याचे आहे. शिवसेना त्याच भूमिकेत उभी ठाकते आहे; हे वास्तव भाजपा जेवढे लौकर मान्य करील तितके शहाणपणाचे ठरेल. खरे तर भाजपाने गेल्या कित्येक वर्षात तशी पावले टाकली आणि शिवसेना मात्र हिंदूत्वाच्या धुंदीत गाफ़ील राहिली. म्हणून मागे पडली. या पालिका मतदानाच्या निमीत्ताने भावी मराठी राजकारणातले खरे दोन स्पर्धक स्वच्छपणे समोर येत आहेत. राजकीय विश्लेषकांनीही ती वस्तुस्थिती समजून घेण्याची गरज आहे.

3 comments:

  1. मनसेने काय करावे? मराठी माणसे काँग्रेसला भाजपाला मत देत नाही का? -Nishant.

    ReplyDelete