Friday, January 13, 2017

शत-प्रतिशत माघार?

युती नकोच ठाणेकर के लिए चित्र परिणाम

ठाण्यात भाजपाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक संपन्न झाली आणि त्यात राज्यभर होऊ घातलेल्या मोठ्या मतदानावर उहापोह होणे स्वाभाविक होते. त्यामुळेच ठाणे शहरातील भाजपाच्या नेते कार्यकर्त्यांनी तिथे जमणार्‍या नेतृत्वाला आपल्या भावना जाहिरपणे सांगण्याचा प्रयत्न करणेही गैर मानता येणार नाही. राज्यात शिवसेनेशी असलेली युती संपवून भाजपा विधानसभेत लढला होता आणि त्यांनी सर्वात मोठा पक्षही होऊन दाखवले आहे. त्यामागे पक्ष कार्यकर्त्यांची मेहनत व हिंमत असल्याची धारणा नेत्यांनीच निर्माण केलेली आहे. कारण त्यानंतर ‘शत-प्रतिशत भाजपा’ असाच नारा घेऊन भाजपा वागलेला होता. त्या कार्यकर्त्याला आताही तसे वाटत असल्यास गैर नाही. पण नेत्यांना मात्र आता तसे वाटत नसावे. दोन वर्षे सत्तेत काढल्यावर भाजपाला युतीची गरज वाटू लागली असावी. म्ह्णून अधूनमधून युतीच्या तर मध्येच पुन्हा शत-प्रतिशत; अशा चर्चा होत राहिल्या आहेत. अशा वातावरणात राज्य निवडणूक आयोगाने मोठ्या मतदानाचा कार्यक्रम जाहिर केला आणि हवाबाजी सोडून प्रत्येक पक्षाला व्यावहारिक विचार करण्याची पाळी आलेली आहे. सहाजिकच भाजपाच्या गोटातून युतीसाठी तीन नेत्यांना बोलणी करण्यासाठी पुढे करण्यात आले. आता किमान शंभर जागांवर भाजपा समाधानी व्हायला तयार असल्याचीही बातमी आलेली आहे. ती बातमी धक्कादायक आहे. कारण ती नुसती शत-प्रतिशत भूमिकेतून घेतलेली माघार नाही. तर उत्साहात असलेल्या कार्यकर्त्यांना हतोत्साहित करण्याची भूमिका आहे. स्वबळावर लढायला उतावळ्या झालेल्या कार्यकर्त्यांना तशी संधीही नाकारणे गैरलागू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांनी कार्यक्रम वा अजेंड्यावर युती होईल असेही म्हटलेले आहे. पण युतीची भाजपाला गरज काय, याचे उत्तर कोणाही नेत्याने दिलेले नाही. हा भाजपा कार्यकर्त्यांचा हिरमोड करणारा पवित्रा आहे.

गेल्या खेपेस भाजपाने सेनेशी युती करताना मुंबईत २२७ पैकी ६३ जागा घेऊन २९ जिंकल्या होत्या, तर १३५ जागा लढवून सेनेने ७५ जागा जिंकल्या होत्या. यावेळी भाजपा किमान शंभर जागांवर समाधान मानायला तयार असल्याची बातमी आहे. म्हणजे त्या शंभरपैकी ८० आपल्याला ठेवून आठवले यांच्या रिपाईला २० जागा बहाल करायचा मसूदा असल्याचे म्हणतात. गेल्या खेपेस रिपाईला युतीमध्ये २९ जागा मिळूनही एकच जिंकता आलेली होती. अर्थात अशा जागावाटपामध्ये जिंकायला अवघड असलेल्या जागा मित्रपक्षाला सोडल्या जात असतात. पण काही जागा काठावरच्या असतात. तिथे किरकोळ मते मित्रपक्षाकडून आपल्या पारड्यात पडली, तरी ती जागा जिंकायला हातभार लागत असतो. त्यासाठीच युती वा आघाडी केली जात असते. शिवसेनेला अशा बाबतीत अधिक यश नेहमीच मिळालेले आहे. भाजपाला तसे काही साध्य करता आलेले नाही. म्हणून कदाचित भाजपाला आत्मविश्वास नसावा. बघायला गेल्यास भाजपाने युतीच्या वाटेने जाण्याची गरज नाही. आपले मुंबईतील बळ प्रचंड वाढलेले आहे, हा भाजपाचा विश्वास असेल तर त्यांनी युतीचा हट्ट करण्याची गरज नाही. लोकसभा वा विधानसभा यांच्याच मतांवर विश्वास ठेवायचा तर भाजपाला स्वबळावर मुंबई पालिकेत सहज बहूमत मिळू शकते. कारण विधानसभेत स्वबळावर लढताना भाजपाने पालिकेच्या १४४ वॉर्डात मताधिक्य मिळवलेले होते. त्यात तथ्य असेल आणि आजही ते वाढलेले बळ भाजपाने राखलेले असेल; तर त्यातल्या दोन तृतियांश जागाही भाजपा सहज जिंकू शकते. त्या जागा ९६ होतात. म्हणजे घट गृहीत धरली, तरी भाजपाला स्वबळावर शत-प्रतिशत मजल मारणे शक्य आहे. मात्र विधानसभेत मिळालेले मताधिक्य हे खात्रीचे असायला हवे. त्यावेळेस सेनेला तितके मताधिक्य मिळालेले नव्हते. मग भाजपा युतीला शरण का जातो आहे?

एक गोष्ट साफ़ आहे. सेना किंवा भाजपा यांची वक्तव्ये बघितली तर दोघांनाही आपल्या एकट्याच्या बळावर बहूमत मिळवण्याचा आत्मविश्वास दिसून येत नाही. पण आपण स्वबळावर लढूनही मोठा पक्ष होऊ शकतो, याविषयी शिवसेना अधिक विश्वासाने बोलते आहे. भाजपाकडे तसा आत्मविश्वास दिसत नाही. म्हणूनच विधानसभेचे यश झाकोळले जाण्याच्या भयाने त्यांना युतीची गरज भासत असावी. तेव्हा १४४ वॉर्डात मिळालेले मताधिक्य वेगळ्या राजकीय स्थितीत व अजेंड्यासाठी मिळालेले असते, तर पालिकेचा अजेंडा भिन्न असतो. ह्याची जाणिव आता मतदानाचा दिवस जवळ आल्यानंतर भाजपाला झालेली असावी काय? अन्यथा अकस्मात शंभर किंवा ८० जागांपर्यंत तडजोडीला उतरण्याचे काही कारण दिसत नाही. आधीच युती केली तर त्याचा लाभ सेनेपेक्षा भाजपाला अधिक मिळू शकतो. कारण भाजपाची अमराठी मते सेनेला वळवली जातील, याची हमी नाही. पण सेनेची मते भाजपाच्या पारड्यात पडू शकतात, हे आजवर अनेकदा सिद्ध झालेले आहे. युतीमुळे भाजपाला यापुर्वी जितका लाभ मिळालेला आहे, तितका मुंबईत तरी सेनेला लाभ झाल्याचे कधी आकड्यात दिसलेले नाही. त्यामुळेच विधानसभेचे तात्कालीन यश टिकवण्याची चिंता भाजपाला युतीकडे ओढत असावी. सायनपासून खेतवाडी बोरीबंदरपर्यंत आणि माहिमपासून धोबीतलावपर्यंत मध्यमुंबईत आजवर भाजपाला कधीही आपला प्रभाव सिद्ध करता आलेला नाही. उपनगरातही भाजपाला मिळालेले यश पालिका वॉर्डात यापुर्वी दिसलेले नाही. पालिकेच्या निवडणूकीत स्थानिक मुरलेल्या रुजलेल्या नेत्याला प्राधान्य असते आणि तसे उमेदवार भाजपापाशी नाहीत. ही वस्तुस्थितीच मुंबईतल्या युतीची अगतिकता असू शकते. त्यात अधिक जागा जिंकण्यापेक्षा विधानसभेच्या वेळचे यश झाकण्याचीच कसरत जास्त दिसते.

शिवसेना आपल्या बळावर आजही ८० जागा जिंकू शकते आणि कमी पडणारे संख्याबळ अपक्ष वा छोट्या पक्षांना सोबत घेऊन सत्तेपर्यंत पोहोचू शकते. त्यातही मनसे दुबळी झाल्याचा लाभ सेनेला मिळाला, तर सेना सहज शंभरी गाठू शकते, हे पक्षप्रमुखांना ताडता आलेले असेल, तर युतीला शरण जाण्याची त्यांना गरज वाटणार नाही. पण डाव केवळ मुंबई महापालिकेपुरता मर्यादित नाही. उरलेल्या नऊ महापालिका व जिल्हा परिषदा वेगळ्या आणि एकटी मुंबई महापालिका वेगळी आहे. युतीसाठी बाकी सर्व जागी सेनेने युतीची कास धरायला हरकत नाही. पण मुंबईत आपली स्वयंभूता सिद्ध करण्यावर सेनेचे भविष्यातील राजकारण अवलंबून आहे. कारण मुंबईत स्वबळावर उभी राहू शकणारी शिवसेनाच राज्यात आपला प्रभाव पाडू शकत असते. मुंबईवर प्रभूत्व राखले, तरच महाराष्ट्राच्या राजकारणाला गवसणी घालण्या्चे बळ मिळते. विधानसभेच्या वेळी सेनेची अगतिकता राज्यव्यापी होती. आज भाजपाची अगतिकता मुंबईकेंद्री आहे. त्यात नुसता मोठा पक्ष होऊनही भाजपाला दणदणित धक्का सेना देऊ शकते. जागांची अपेक्षा खाली आणुन भाजपाने दुबळेपणाचा संकेत दिला आहे. तेवढ्याने सुखावून सेना नेतृत्व दिडशेपेक्षा कमी जागी आपले उमेदवार उभे करायला तयार झाली, तर पक्षीय महत्वाकांक्षेला घातलेली ती मुरड असेल. मुंबईत भाजपासह अन्य मित्रपक्षांना पाऊणशेहून अधिक जागा सेनेने सोडायचे ठरवले, तर सोडलेल्या जागी मनसेला डोके वर काढता येईल. उलट याक्षणी मनसे अधिक शिवसेना इतक्या जागा सेनेसाठी हक्कच्या आहेत. ते समिकरण चुकवले तर सेनेला आगामी राजकारणात भाजपा डोईजड होऊन बसणार. अधिक मराठी बाण्याच्या मक्तेदारीवर हक्क सांगायला मनसे शिरजोर होऊ शकते. भाजपाने शंभर जागा मागण्याचा अर्थच त्याला आत्मविश्वास नाही. ती भाजपाची शत-प्रतिशत माघार आहे. त्याचा सेना किती लाभ उठवते ते दिसेलच.

No comments:

Post a Comment