Saturday, January 28, 2017

रेल्वे घातपाताचे बोलविते धनी

railway accident terror के लिए चित्र परिणाम

गेल्या काही दिवसात रेल्वे अपघाताची एक शृंखलाच सुरू झालेली आहे. त्यामध्ये दिसून येणारे एक साम्य म्हणजे प्रत्येक जागी रुळ उखडलेले असल्याने भरधाव वेगाने पळणार्‍या रेल्वेगाडीला अपघात झालेला आहे. प्रचंड वेगाने दौडणार्‍या त्या गाडीचे डबे रुळावरून घसरतात आणि मग एकमेकांवर चढून भीषण अपघात होतात. हे अपघात अकस्मात सुरू झालेले असू शकत नाहीत. रेल्वे अपघात जगातल्या प्रत्येक देशात होत असतात आणि अगदी प्रगत देशातही होत असतात. त्यात मानवी निष्काळजीपणाचे कारण असू शकते, तसेच काही तांत्रिक बिघाडामुळेही अपघात होतात. भारतही त्याला अपवाद नाही. पण जेव्हा जाणिवपुर्वक अपघात घडवले जातात, तेव्हा त्याला अपघात म्हणता येत नाही. त्याला घातपात ठरवणे भाग असते. रेल्वेच्या रुळांचे जाळे देशाच्या कानाकोपर्‍यात पोहोचलेले असून, त्या प्रत्येक फ़ुटावर किंवा जागी अखंड पाळत ठेवणे अशक्य आहे. मात्र अशा रेल्वेच्या रुळांची अखंड देखभाल चालू असते. गॅन्गमन नावाचा कर्मचारी गटागटाने रुळांच्या बाजूने वाटचाल करून त्यांची अहोरात्र देखभाल करीत असतो. अशा गॅन्गमनच्या टोळ्या विखुरलेल्या असतात आणि जिथे रुळांमध्ये सैलपाणा आलेला असतो किंवा किरकोळ नादुरुस्ती असते; त्याची डागडुजी तिथल्या तिथे केली जात असते. फ़ार कशाला रुळांवरून भरधाव गाड्या पळवण्यासाठी त्यातले समांतर ठराविक असणेही अगत्याचे असते. त्याची वेळोवेळी पहाणी चालू असते. जिथे गाड्यांची संख्या मोठी व सातत्याने जे रुळ वापरले जातात; तिथे अधिक देखभाल केली जाते. तिथे पहाराही सातत्याने दिला जात असतो. पण ज्या लोहमार्गावरून कमीतकमी गाड्या धावतात, तिथे अखंड पहारा नसतो, की देखभालही नित्यनेमाने करावी लागत नाही. सहाजिकच आठदहा गाड्याच जो लोकमार्ग वापरतात, तिथले रुळ काहीसे दुर्लक्षित रहातात. झालेले अपघात अशाच जागी घडलेले आहेत.

बहुतांश लोहमार्ग खेड्यापाड्यातून जाणारे असतात आणि त्यांच्या सभोवती गावे वस्त्या वसलेल्या आहेत. अशा निर्जन भागातील लोहमार्गावर कोणाचा पहारा नसतो. पण तिथूनही वेगाने पळणार्‍या गाड्या धावत असतात., त्यापैकी दोनचार फ़ुटाचा रुळ जरी उखडलेला असेल, तर वेगाने धावणार्‍या गाडीला भीषण अपघात होऊ शकतो. कारण इंजिन पुढे असते आणि मागे नुसते डबे जोडलेले असतात. दौडणार्‍या गाड्यांना आपली एक गतिमानता प्राप्त झालेली असते. सहाजिकच त्यापैकी एका डब्याला तरी ब्रेक लागला तरी मागचा व पुढले डबे आधीच्याच वेगाने त्याला धक्का देत असतात. २०-२५ डब्यांच्या गाडीचा एक डवा रुळावरून घसरला, तरी मागचे डबे आपल्या गतिमानतेमुळे पुढल्या डब्याला ढकलून पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. त्यातून मग डबे एकमेकांवर चढण्याचा व भीषण अपघाताचा प्रसंग ओढवत असतो. गेल्या काही रेल्वे अपघातांचे निरीक्षण केल्यास त्यामध्ये अशाच अपघातांचे प्रमाण आढळून येईल. शिवाय जेव्हा असे अपघात लागोपाठ घडू लागतात, तेव्हा त्यामागे काही योजना वा कारस्थान असल्याची शंका येणे स्वाभाविक असते. कुठल्याही रेल्वे अपघाताची चौकशी केली जाते, तशीच अलिकडल्या अपघातांची चौकशी होत असताना हे साम्य आढळून आले. म्हणूनच त्याचे धागेदोरे शोधण्याचा प्रयास झाला असता, त्यातले कारस्थान उजेडात आलेले आहे. पाकिस्तानप्रणित गुप्तहेर संस्था भारतात गेली अनेक वर्षे विविध मार्गाने घातपात घडवून आणण्याचे उद्योग करते आहे, ही बाब आता नवी राहिलेली नाही. मुंबईच्या लोकल रेल्वेमध्ये बॉम्ब ठेवून अनेक घातपात घडवलेले आहेत, बसमध्येही असे घातपात झालेले आहेत. त्यातलाच हा नवा प्रयोग आहे. आणि अर्थातच अतिशय सोपा व स्वस्तातला घातपाती प्रयोग असे म्हणता येऊ शकेल. पण त्यामागचा बोलविता धनी कोण आहे?

यापुर्वी कसाब टोळी पाठवून किंवा स्फ़ोटके वापरून स्फ़ोट हिंसा घडवण्यात आली. त्यासाठी अत्याधुनिक हत्यारे वा स्फ़ोटके पुरवावी लागतात. त्यासाठी सुरक्षा यंत्रणेचा डोळा चुकवून वाहतुक करावी लागते. घातपात घडवणार्‍यांना अतिशय सुक्ष्म प्रशिक्षण देऊन सज्ज करावे लागते. त्यासाठी गोपनीयता राखावी लागते. विविध मार्गाने त्याचे नियंत्रण करावे लागते. पुर्वनियोजन करावे लागते आणि ते सर्व केल्यावरही घातपात करणार्‍यांचा सुगावा लागू शकतो. कारण त्यांना लोकवस्तीत वास्तव्य करून आपली पापकर्मे उरकावी लागत असतात. पण निर्मनुष्य भागातले रेल्वेरुळ उखडणे हे सर्वात सोपे काम आहे. एकतर वर्दळीची भिती नसते आणि कुठल्याही नजरेत भरणार्‍या खास हत्यारे स्फ़ोटकांची गरज भासत नाही. कुठेही खेड्यापाड्यात उपलब्ध असलेली अवजारे किंवा साधने वापरून रेल्वेचे रुळ उखडण्याचे काम उरकता येते. पुढे काही तासांनी तिथून बेसावध रेल्वेगाडी धावणार असल्याने आरामात निसटता येते. चटकन रूळ उखडले गेल्याचे कोणाच्याही लक्षात येऊ शकत नाही. त्यामुळे अपघातातून घातपात ही सर्वात सोपी योजना असू शकते. किरकोळ पैसे मोजूनही लोकांना त्यासाठी कामाला जुंपता येते. फ़क्त त्यापैकी कोणी गडबडून पोलिसांकडे चुगली केली नाही म्हणजे झाले. याच मार्गाचा अवलंब झालेला दिसतो. सर्वात असुरक्षित जागी घातपात करायचा आणि सर्वात सुरक्षित अशा व्यवस्थेला उध्वस्त करायचे, असा त्यामागचा हेतू असू शकतो. अशा अपघातातून हजारो लोक जखमी होतात आणि शेकड्यांनी मरतात. त्यातून देशातील व समाजातील सुरक्षेविषयी शंका निर्माण होतात. पर्यायाने प्रशासन व सरकारविषयी लोकांना विश्वास वाटेनासा होतो. कुठल्याही सरकारला बदनाम करण्याचा यापेक्षा सोपा मार्ग नसतो. आताही अशा अपघाताचा जाब सरकारला विचारला जाणार. पण अशा स्थितीत सरकार वा सुरक्षा यंत्रणा काय करू शकते?

कुठल्याही सरकार वा प्रशासनाची अगतिकताही विचारात घेतली पाहिजे. अशा निर्जन भागातील रेल्वे रुळाच्या प्रत्येक फ़ुट-यार्ड अंतरावर पहारा बसवता येत नाही. मग काय करायचे? तर असा घातपात करू शकणार्‍या कुणाही संशयिताला ताब्यात घेऊन त्याचा बंदोबस्त करणे. संशयाच्या आधारे कुणालाही पकडण्याला कायदा संमती देत नाही. इथे सुरक्षा यंत्रणा लंगड्या पडतात. ही एक बाजू असतानाच दुसर्‍या बाजूला जी काही आपली शक्ती व बुद्धी पणाला लावून गुप्तचर यंत्रणा घातपात्यांना जाळ्यात पकडू बघत असतात, त्यालाही तथाकथित मानवाधिकाराचा मुखवटा लावून नामोहरम केले जात असते. गेल्या दोनतीन दशकात भारतामध्ये पाक हेरखात्याने विणलेले जाळे प्रत्येक घातपाताने उघडकीस आणलेले आहे. त्यात आढळणारे संशयित व आरोपीही एकाच समाजघटकातले आहेत. पण अशा कुणाला पकडले गेले, मग तात्काळ धार्मिक भेदभाव झाल्याचा कल्लोळ सुरू होतो. तपास बाजूला पडून राजकारणाला ऊत येतो. एका धर्माच्या लोकांना पकडले तर दुसर्‍या धर्माचे आरोपी का पकडत नाहीत, असा आक्षेप घेतला जातो. त्यातून तपासयंत्रणांना नामोहरम करण्यात आलेले आहे. मालेगाव येथील स्फ़ोटाच्या निमीत्ताने हिंदू दहशतवादाचे अवडंबर इतके माजवण्यात आले, की समझोता एक्सप्रेस गाडीच्या घातपाताचा तपास संपला असताना, त्यातही मालेगावच्या आरोपींना गुंतवण्यासाठी यंत्रणांवर दडपण आणले गेले. त्या घातपातामध्ये पाकचाच हात असल्याचे युनोच्या समितीनेही स्पष्ट केले असताना, भारतीय राजकारणासाठी त्यात कर्नल पुरोहित यांना गुंतवण्याचे राजकारण खेळले गेले. सहाजिकच कुणी मुस्लिम संशयित असला तरी त्याला पकडण्यास वा त्याच्यावर संशय घेण्यालाच अघोषित बंदी आणली गेली. त्याचेच परिणाम तपासावर आणि घातपाती घटनांवर होत असतात.

पाकिस्तान नेहमीच म्हणतो, की आपण भारतात कुठले घातपात व दहशतवाद घडवत नाही. जे काही होत असते, त्याला भारतातीलच असंतोष कारणीभूत आहे. असे असताना भारत सरकारचे राज्यकर्तेच पाकच्या भूमिकेला दुजोरा देणार्‍या उचापती करीत असतील, तर घातपाताला पायंबद घालायचा कोणी? इशरत जहान वा मालेगाव या घटनांमध्ये योग्य तपास झालेला असताना, त्यात हिंदू दहशतवाद घुसडण्याचा जो उद्योग युपीएच्या कारकिर्दीत झाला. त्यात तपासयंत्रणाही भरडल्या गेल्या. त्याचा परिणाम म्हणून पाक हेरसंस्थेला भारतातच आपले हस्तक निर्माण करून कुठेही घातपात घडवणे सोपे होऊन गेले. त्यांचे काम सोपे करण्याला प्रोत्साहन युपीए सरकार व त्याच्या धोरणाने मिळालेले आहे. त्याचे अनेक धागेदोरे आता चव्हाट्यावर आलेले आहेत. अलिकडल्या काळात नोटाबंदीमुळे स्फ़ोट व बॉम्ब अशा खर्चिक घातपाती योजना आखणे पाकिस्तानला अवघड झालेले आहे. त्यामुळेच स्वस्तातला मार्ग शोधणे त्यांना भाग होते, त्यातूनच रेल्वे रुळ उखडण्याचा पर्याय पुढे आलेला आहे. त्यात कुणालाही किरकोळ पैसे देऊन वा कामाला जुंपून मोठी हिंसा घडवणे शक्य झालेले आहे. त्याला पायबंद घालणे प्रचलीत कायदे व कार्यशैलीत अशक्यप्राय आहे. इथेही कानपूरच्या अपघातानंतर तपास यंत्रणांनी माग काढला, तेव्हा काही धागेदोरे मिळालेले आहेत. त्यानंतर अन्य अपघातांची कसून तपासणी करताना साम्य आढळून आले आहे. पण त्यावरचा उपाय सोपा नाही किंवा उपलब्ध नाही. जोवर अशा कृतीमध्ये सहभागी असलेल्यांसाठी कठोर उपायांची अंमलबजावणी होत नाही, तोवर घातपाताला आळा घालणे अशक्य आहे. देशात कोट्यवधी मैल पसरलेल्या लोहमार्गावर पहारा ठेवणे अशक्य आहे. पण स्थानिक लोकांनाच निगराणी ठेवून कुणाही संशयिताला रोखण्याची मुभा दिल्याखेरीज असे अपघात वा घातपात संपण्याची बिलकुल शक्यता नाही.

राजकारण आणि देशहित यात फ़रक असतो. जिथे देशहिताचा विषय येतो, तिथे पक्षीय राजकारण बाजूला ठेवून देशहिताच्या बाजूने एकजुटीने उभे रहाणे अगत्याचे असते. पण मध्यंतरीच्या दहा वीस वर्षात त्याचे भान सुटत गेले आहे. मुस्लिम मते एकगठ्ठा मिळतात, या समजुतीमुळे सेक्युलर म्हणवणार्‍या पक्षांनी दहशतवादालाही पाठीशी घालण्याची जी दिवाळखोरी केली, त्याचे परिणाम आज आपण भोगत आहोत. हे जगभर चालले आहे. आठवडाभर आधी अमेरिकेचे ४५ वे अध्यक्ष म्हणून सुत्रे हाती घेताना डोनल्ड ट्रंप यांनी जगाच्या पाठीवरून जहाल इस्लामी दहशतवाद निपटून काढला पाहिजे, असे विधान केले होते. पण त्याचा अर्थ त्यांनी इस्लाम विरोधी पवित्रा घेतल्याचा कल्लोळ सुरू झाला. याचा अर्थ कसा घ्यायचा? इस्लाम म्हणजेच जहाल दहशतवादी मुस्लिम असेच सेक्युलर मत आहे काय? जगातला प्रत्येक मुस्लिम जहाल दहशतवादी आहे काय? नसेल तर ट्रंप यांचे विधान मुस्लिम विरोधी नव्हेतर जिहादी मानसिकतेच्या विरोधातले होते. पण त्याचा विपर्यास करून तमाम मुस्लिमांच्या विरोधात ट्रंप बोलल्याचा गवगवा करण्यात आला. हेच तर जिहादी मानसिकतेचे सुरक्षा कवच झालेले आहे. तेच भारतातही झालेले आहे. मुस्लिमांची गठ्ठा मते मिळवण्याच्या नादात तथाकथित पुरोगामी पक्षांनी जिहादी मानसिकता व कारवायांचे समर्थन करण्यातून एकूण देशहित व सुरक्षा धोक्यात आलेली आहे. त्यातूनच मग पाक हेरसंस्था असो किंवा इसिससारख्या भयंकर जिहादी संघटना असोत, त्यांनाच प्रोत्साहन मिळत गेलेले आहे. त्यांना हळव्या धार्मिक मानसिकतेचे मुस्लिम हस्तक मिळणे सोपे होऊन गेलेले आहे. त्यांना आपल्या विघातक कारवायांसाठी किमान खर्चात वापरणे सोपे होऊन गेलेले आहे. कुठल्याही गुन्ह्यामध्ये त्यामागे असलेली प्रेरणा अधिक घातक असते. आज देशातील घातपात वा जिहादी मानसिकतेचे पोशिंदे म्हणूनच खरी समस्या बनली आहे.

अशा बाबतीत ज्यांना पकडले जाईल त्यांचा धर्म बघून राजकारण खेळले जाणार असेल, तर प्रशासनालाही अंग आखडावे लागते. तपास यंत्रणांचे खच्चीकरण होते. मालेगाव किंवा इशरत प्रकरणात तात्कालीन केंद्रीय गृहमंत्र्यांनी आपल्या पक्षीय स्वार्थासाठी अशा यंत्रणांना दुबळे करण्यात धन्यता मानली. आज त्याचाच लाभ पाक गुप्तहेर संस्था लाभ उठवत असेल, तर त्याचा दोष शेजारी देशाच्या माथी मारून चालणार नाही. कारण भारत सरकार वा इथल्या शासकीय यंत्रणा पाकिस्तानात जाऊन त्या संस्थेच्या मुसक्या बांधू शकणार नाही. पण त्यांचे इथले हस्तक आहेत त्यांची गठडी वळणे आणि त्यांचे हस्तक होऊ शकतात, त्याला पायबंद घालणे; आपल्या हातात आहे. पण दुर्दैवाने त्यालाच खीळ घातली जाते. सर्जिकल स्ट्राईकवर शंका घेतल्या जातात. अतिरेकी जिहादी मारले तरी त्यांच्या समर्थनाला मान्यवर राजकीय सेक्युलर नेतेच पुढे येतात. अशा प्रत्येक कृतीतून आपल्या सुरक्षा यंत्रणांना व तपास यंत्रणांचे पाय मागे ओढले जात असतात. मग त्यांच्याकडून कुठल्या रेल्वे प्रवाश्याने वा भारतीय नागरिकाने सुरक्षेची काय अपेक्षा बाळगावी? जी यंत्रणा वा त्यातले अधिकारी आपल्यावर राजकीय हेतूने आरोप होतील वा गळचेपी होईल; अशा भयाने पछाडलेले आहेत; त्या यंत्रणेकडून कुठल्या कर्तृत्वाची व पराक्रमाची अपेक्षा बाळगता येईल? समस्या पाकची हेरसंस्था वा तिचे भारतातील हस्तक ही नाही. त्यांना प्रोत्साहन देणारे इथेच उजळमाथ्याने वावरत असतात, त्यांना मोकाट रान मिळालेले आहे, ती खरी समस्या आहे. जोवर राजकीय मतलबासाठी अशा घातपात व दहशतवादाला पाठीशी घालणे आपल्या देशात प्रतिष्ठीतपणे चालू रहाणार आहे, तोवर घातपात वा तसे अपघात संपू शकत नाहीत. त्याला पायवंद सरकार घालू शकत नाही. अशा छुप्या देश विघातक राजकारणाला मतदार जनतेनेच वेसण घालावी लागेल. कारण मतांच्या राजकारणात तोच एक जालीम उपाय असू शकतो.


No comments:

Post a Comment