Sunday, January 15, 2017

बच्चा लोग, ठोको ताली

rahul sidhu के लिए चित्र परिणाम

आपल्या चटकदार व गुदगुल्या करणार्‍या भाष्यांमुळे माजी कसोटी क्रिकेटपटू नवज्योत सिद्धू प्रसिद्धी पावलेले आहेत. आपल्या क्रिकेट कारकिर्दीत त्यांना लोकप्रियता फ़ारशी मिळवता आलेली नव्हती. पण १९९५ नंतर जे उपग्रह वाहिन्यांचे पेव फ़ुटले, तेव्हा खेळाच्या समालोचनासाठी निवृत्त खेळाडूंना काम मिळू लागले. त्यात सिद्धू यांचा समावेश होता. आपल्या यमके व जुमल्यांमुळे सिद्धू लोकप्रिय होत गेले. त्यांच्या अशा चटकदार विधाने व भाष्याला सिद्धूइझम अशीही उपाधी लावली गेली. मात्र खरा स्टार म्हणून हा माणूस देशव्यापी झाला, तो वेगळ्या कारणाने! एका वाहिनीने नकलाकारांचा खास स्पर्धात्मक कार्यक्रम सुरू केला. त्यात शेखर सुमन नामे अपयशी हिंदी अभिनेत्याने पुढाकार घेतला होता. आपल्या हजरजबाबी व फ़टकळ टिप्पण्यांनी सुमन आधीच लोकप्रिय झाला होता. सिद्धूला सोबत घेऊन सुमन याने लाफ़्टर शो नावाची स्पर्धा सुरू केली आणि सिद्धू त्यापैकी एक परिक्षक म्हणून सहभागी झाला. पण विनोदाचे परिक्षण करण्यापेक्षा स्वत:च गदगदा हसून धमाल उडवून देणारा ‘सरदार’ सिद्धू लोकप्रिय होऊन गेला. त्याची लोकप्रियता विरोधाभासी होती. हास्याचे फ़वारे उडवण्याची त्याची शैली त्याचे कारण होते. आपल्या हास्यास्पद आत्मविश्वासपुर्ण आवेशात बोलण्याची त्याची शैली, कोणी गंभीरपणे घेत नाही. पण टाईमपास करण्याचे साधन म्हणून त्याच्याकडे बघितले गेले. त्याचा लाभ उठवत भाजपाच्या नेतृत्वाने त्याला पक्षात आणले आणि अमृतसर येथून लोकसभेत निवडूनही आणले. पण वाहिन्यांवर मिळणार्‍या टाळ्या किंवा लोकांचे कौतुक आणि प्रत्यक्ष जीवनातील राजकीय घडामोडी; यांच्याशी संबंध नसलेल्या सिद्धूने स्वत:विषयी मोठा गैरसमज करून घेतला. त्यातूनच आता त्याने कॉग्रेस प्रवेश केलेला आहे. राहुल गांधींनी त्याचे कॉग्रेसमध्ये स्वागत केले, यातच सर्व काही आले.

तसे बघायला गेल्यास गेल्या लोकसभेपासूनच सिद्धू यांचे भाजपाशी फ़ाटलेले होते. त्यांना कधी पंजाबमध्ये सत्तेत असलेल्या अकाली दलाशी जुळवून घेता आले नाही. परिणामी लोकसभेत त्यांना अमृतसरची उमेदवारी देऊ नये, अशी अट अकालींनी घातली होती आणि बहूमताच्या शर्यतीत भाजपाला कटकटी नको होत्या. म्हणूनच मग सिद्धू यांना बाजूला करण्यात आले. पण तेव्हापासूनच त्यांचे मन उठलेले नव्हते. त्याच्याही आधी दिडवर्ष गुजरातच्या विधानसभा निवडणुकीत सिद्धू मोदींच्या मनातून उतरलेले होते. कारण सिद्धू यांना जाहिर भाष्य करताना संयम राखता येत नाही. व्यक्तीगत वक्तव्ये आणि राजकीय वक्तव्ये यात मोठी तफ़ावत असते. व्यक्तीगत पातळीवर तुम्ही काहीही बोलायला मोकळे असता. पण एखाद्या संघटनेत वा पक्षात सहभागी झाले, की व्यक्तीगत मताला वेसण घालून धोरणात्मक भूमिकेतून मते व्यक्त करावी लागतात. सिद्धूंना ती मर्यादा पाळता येत नाही. मनोरंजक कार्यक्रम आणि राजकीय वक्तव्य यातील फ़रक ओळखता येत नसल्यानेच, अनेकदा सिद्धू हास्यास्पद झालेले आहेत. गुजरातच्या गेल्या विधानसभेत मोदींचे वडिलधारे व ज्येष्ठ नेते केशूभाई पटेल, वेगळा पक्ष स्थापन करून मोदींच्या विरोधात उतरलेले होते. पण त्यांनी कितीही कठोर शब्दात निंदा केली, तरी भाजपातर्फ़े कोणी केशूभाईंचा अनादर करणारे वक्तव्य देऊ नये; यावर मोदींचा कटाक्ष होता. मात्र तिथे भाजपाचाच प्रचार करायला गेलेल्या सिद्धूंनी एका सभेत केशूभांईचा गद्दार म्हणून उल्लेख केला आणि मोदी विचलीत झाले. त्यांनी नंतर कुठल्याही सभेत सिद्धूंना भाजपाचा प्रचार करण्यापासून रोखले व परत पाठवून दिले. तिथून खरे तर सिद्धू मोदींच्या मनातून उतरले होते. अमृतसरची उमेदवारी जाणे ही नंतरची घटना. मुद्दा इतकाच, की असा माणूस कुठल्याही राजकीय पक्षासाठी अडचणच असते.

त्यानंतर सिद्धू नव्या राजकीय आश्रयस्थानाच्या शोधात होते. आरंभी केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षानेही त्यांना जवळ घेण्याचा प्रयास केला होता. त्या पक्षात सिद्धूंच्या पठडीतला भगवंत मान नावाचा खासदार आहेच. शेखर सुमन व सिद्धू यांच्या लाफ़्टर शोमधून देशाला ठाऊक झालेला हा नकलाकार; गेल्या लोकसभेत आम आदमी पक्षाचा उमेदवार म्हणून लोकसभेत निवडून आलेला आहे. आपल्या पोरकटपणाचे नवनवे अविष्कार त्याने आतापर्यंत घडवलेले आहेतच. त्यामुळे सिद्धू केजरीवालच्या पक्षात जाण्याची शक्यता बोलली जात होती. दोघांमध्ये बोलणीही झाली. पण निष्पन्न काही झाले नाही. कारण सिद्धू यांनी पक्षात यावे, पण विधानसभेची निवडणूक लढवू नये, असा केजरीवाल यांचा आग्रह होता. तर आपल्यालाच भावी मुख्यमंत्री म्हणून पेश करावे, अशी सिद्धूची अट होती. त्यातून काहीही सिद्ध झाले नाही, मग या गृहस्थांनी स्वतंत्रपणे नवा पक्ष उभारण्याची घोषणा केली. ‘आवाज ए पंजाब’ नावाची घोषणा केली. त्यात परगटसिंग आदी जुन्या खेळाडूंना सोबत घेतले. त्यांची पत्रकार परिषद गाजली. पण पुढे काही झाले नाही. अशा रितीने बोलबाला खुप झाला. पण राजकीय आघाडीवर शांतता होती. भाजपा सिद्धूला परत बोलावत नव्हता आणि अन्य कुठला पक्ष त्याला आमंत्रणही देत नव्हता. अशा त्रिशंकू स्थितीत या गृहस्थांना आपले राजकीय अस्तित्व टिकवण्याची अगतिकता भेडसावू लागली. त्यामुळेच आता निवडणुका समोर येऊन उभ्या ठाकल्यावर तोंड दाखवायला जागा शिल्लक रहावी, म्हणून सिद्धूंनी कॉग्रेस प्रवेश केला आहे. त्यापासून पंजाबी कॉग्रेसनेते अमरींदर सिंग दूर आहेत, ही खुप बोलकी गोष्ट आहे. स्वागत राहुलने केले असे दाखवण्याचा केविलवाणेपणा त्यातून लपून राहिलेला नाही. पण प्रश्न सिद्धूचा नसून कॉग्रेसचा आहे. त्यांना कुठला लाभ मिळणार आहे?

आधीच राहुल गांधी त्या पक्षाचे सर्वेसर्वा म्हणून वाटेल ते बोलून नित्यनेमाने विनोद निर्मीती करीत असतातच. त्यात सिद्धू कोणती भर घालणार, याचे उत्तर कोणाला देता येणार नाही. कॉग्रेसचे राजकारण व धोरण याविषयी सिद्धू किती जागरुक आहेत? त्याचाही मुद्दा नाही. विषय इतकाच आहे, की सिद्धू आपल्या बेताल शैलीतच बोलत गेले, तर कॉग्रेस कशाचे समर्थन करणार आणि कुठे खुलासे देत बसणार आहे? कारण बेछूट व बेताल बोलण्याची जबरदस्त क्षमता सिद्धूपाशी आहे. कुठल्याही क्षणी व कुठल्याही स्थळी संदर्भहीन बोलून गोंधळ घालण्याची सिद्धूची क्षमता; त्या पक्षाला अडचणीत आणू लागली तर काय होणार? गेल्या खेपेस राहुल गांधींनी ऐन विधानसभेत पंजाबचा बहुसंख्य तरूण नशाबाज झाल्याचे बोलून टाकले आणि कॉग्रेसला निकालात त्याचा फ़टका बसला होता. आता एका राहुलच्या जागी दोन राहुल मैदानात असतील. विविध मतचाचण्यांचे अहवाल बघता कॉग्रेस केवळ अमरिंदर सिंग यांच्या लोकप्रियतेवर बहूमताची मजल मारण्याच्या स्थितीत आहे. तिला राहुलने प्रचार करण्याचीही गरज नाही. अशावेळी एक राहुल नुकसान करायला सज्ज असताना, आणखी एक त्याच पठडीतला सिद्धू आणायची काय गरज होती? थोडक्यात आतापर्यंत राहुल मनोरंजन करीत होते. त्यांच्या जोडीला सिद्धूला आणले गेले, असेच म्हणणे भाग आहे. कारण सिद्धू आपल्या शैलीत राजकारण बोलू लागले, म्हणजे कॉग्रेसची कॉमेडी सर्कस पुर्ण होऊन जाईल. म्हणूनच बच्चा लोग ताली ठोको, असे सांगणे भाग आहे. केजरीवाल शहाणा म्हणायचा. त्यांनी सिद्धूची गुणवत्ता ओळखली होती आणि त्याला चेहरा बनवण्यास साफ़ नकार दिला. निव्वळ प्रचारासाठी घेण्याची तयारी दर्शवली. कारण एक भगवंत मान संभाळताना त्याच्याही नाकी दम आलेला आहे. त्यात सिद्धूची भर पडली तर नको होती. कॉग्रेसमध्ये आता राहुल एकटे राहिले नाहीत म्हणायचे.

1 comment:

  1. पाच पैकी २ जोकर एकत्र महाराष्ट्र दिल्ली बिहारचे already मित्रपक्ष आहेतच

    ReplyDelete