Friday, January 27, 2017

युती तुटल्याचे फ़ायदेतोटे

SS BJP Cartoon के लिए चित्र परिणाम

प्रजासत्ताकदिनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युती तोडल्याची घोषणा केली. त्याचा अर्थ महापालिका वा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत शिवसेना व भाजपा यांची युती होणार नसल्याची घोषणा केली. त्याच्या आधी दोन पक्षात बोलणी चालू होती आणि उमेदवारी अर्ज भरण्याचे काम सुरू झालेले होते. त्यामुळेच अधिक काळ युतीचे गुर्‍हाळ घालण्यात अर्थ नव्हता. मागल्या विधानसभेच्या वेळी तेच झाले होते आणि बोलणी चालू ठेवूनही भाजपाने उमेदवार निश्चीत केलेले होते. सेना मात्र पुरती गाफ़ील होती. याही वेळी दोन्ही पक्ष युती होणार नाही, असे गृहीत धरून आपापल्या तयारीला लागले होते. पण शिवसेनेचा जीव मुंबई पालिकेच्या तिजोरीत अडकल्याचा पक्का समज भाजपाने करून घेतला होता. म्हणूनच त्यांनी सेनेची शक्य तितकी अडवणूक करून अधिकाधिक लाभ उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र भाजपाला युती नको होती, असा त्याचा अर्थ निघत नाही. कारण विधानसभा व लोकसभा आणि पालिका यातल्या मतदानात फ़रक असतो. नेत्याची लोकप्रियता व आयाराम गयाराम यावर पालिका जिंकता येत नसते. त्यामुळेच मोदींच्या लोकप्रियतेवर किंवा अन्य पक्षातून आयात केलेया उमेदवारांवर पालिका जिंकण्याचा आत्मविश्वास भाजपामध्ये नव्हता. पण स्वबळावर लढायची भिती घालून अधिकाधिक जागा सेनेकडून पदरात पाडून घेण्याचा जुगार खेळला जात होता. तोच उलटला आहे. कारण खरेच स्वबळावर लढणे शक्य असते, तर युतीसाठी भाजपाने विचारही करण्याची गरज नव्हती. जागा मागण्याचाही विषय येत नव्हता. पण मुंबईवरली सेनेची पकड नुसते उमेदवार आयात करून संपवता येत नाही, हे भाजपाही जाणून होता. म्हणून युतीचे प्रयास भाजपा करीत होता. तर सेनेला युती संपवण्याचेच वेध लागलेले होते. प्रजासत्ताकदिनी त्याचीच घोषणा झाली. परिणाम काय होतील?

शिवसेना जेव्हा कोंडीत सापडते किंवा तिची कोंडी केली जाते; तेव्हा ती नेहमी उसळी मारून पुढे आलेली आहे. हा आजवरचा इतिहास आहे. आणखी एक गोष्ट अशी, की विधानसभा व लोकसभेच्या मतदानावर सेनेची ताकद जोखता येत नाही. १९९० सालात प्रथमच मुंबईत सेनेचे आमदार युतीमुळे मोठ्या संख्येने निवडून आले. पण त्यानंतरच्या महापालिका मतदानात सेनेला आपल्या आधीच्या संख्येइतकेही बळ राखता आलेले नव्हते. म्हणजेच विधानसभेत काहीही बळ नसताना मुंबई पालिकेत सत्ता मिळवलेल्या सेनेने १९९२ सालात हाती असलेली सत्ता गमावली होती. उलट सात वर्षापुर्वी विधानसभेत भूईसपाट झालेल्या शिवसेनेने दोन महिन्यात झालेल्या पालिका मतदानात स्वबळावर सत्ता मिळवली होती. हे चमत्कार समजून घेण्यासारखे आहेत. तेव्हा राजीव लाटेने मुंबई पादाक्रांत केलेली होती. नंतरच्या विधानसभा मतदानातही सेनेला प्रभाव पाडता आलेला नव्हता. अर्थात सेनेला फ़क्त राजीव लाटेचाच फ़टका बसलेला नव्हता. दोन वर्षे आधी झालेल्या गिरणीसंपाने मुंबई ढवळून काढलेली होती. त्यामुळेच सेनेचे प्रभावक्षेत्र असलेल्या गिरणगावात सेना संपली मानले जात होते आणि तिथे राजीव लाट भेदून दत्ता सामंत लोकसभेत निवडून गेले होते. त्यांचे चार सवंगडी विधनसभेतही निवडून आलेले होते. अशा पार्श्वभूमीवर दोन महिन्यांनी पालिकेचे मतदान झाले, तेव्हा सेनेतले अनेक दिग्गज उमेदवार व्हायला राजी नव्हते आणि स्वबळावर सर्व जागा लढवण्याची हिंमत बाळासाहेबांनी केली होती. त्यासाठी प्रत्येक शाखाप्रमुखाला मैदानात उतरवले गेले. परिणाम असा झाला, की सेना स्वबळावर मोठा पक्ष होऊन सत्तेत येऊन बसली. उलट १९९२ सालात विधानसभेत यश मिळवलेल्या सेनेने पालिकेतील सत्ता मात्र गमावली होती. म्हणजे लोकसभा वा विधानसभेचा मतदानाचा रोख पालिकेत आढळून येत नाही.

युती संपल्याचा निर्णय घोषित करताना उद्धव ठाकरे यांच्यासमोर दोन कारणे असू शकतात. आजही युती म्हणून सरकारमध्ये त्यांना फ़ारशी किंमत वा सत्ता मिळालेली नाही. त्यामुळे असलेली सत्ता गमावण्यात मोठे कुठलेही नुकसान नाही. शिवाय आपला बालेकिल्ला असलेल्या मुंबईत भाजपाशी आताच पडते घेतले, तर नंतर सतत भाजपा अडवणूक करीत राहील यात शंकाच नाही. म्हणून आताच त्याला कडाडून विरोध करायचा. त्यातून स्वबळावर यश मिळवले तर भाजपाचा नक्षा उतरू शकतो आणि नंतरच्या काळात भाजपाला कोंडीत पकडण्याचा जुगारही खेळता येईल. अशा दोन तर्कावर उद्धव यांनी युती मोडण्याचे धाडस केलेले आहे. यापुर्वी त्यांनी कल्याण डोंबिवली महापालिकेतही मतदानपुर्व युती नाकारली होती आणि भाजपाने उमेदवार आयात करूनही त्याला मोठी मजल मारता आलेली नाही. अर्थात त्यापेक्षा मुंबईत सेनेचे मोठे विणलेले जाळे आहे आणि शाखांचा विस्तार भरपूर आहे. त्यामुळेच स्वबळावर लढण्याची कुवत असलेला शिवसेनाच एकमेव पक्ष आहे. तर तडजोड कशाला करायची? शिवाय कुठल्याही विभागणीनंतर सर्वात मोठा पक्ष झाला, तरी सेनेला सत्ता मिळतेच आणि किरकोळ फ़रक पडला तर लहानसहान पक्ष अपक्ष हाती धरूनही सत्ता बळकावता येते. पंधरा वर्षात वारंवार राज्याची सत्ता कॉग्रेसकडे असूनही पालिकेत सेनेने बाजी मारलेली आहे. मग आज भाजपाला घाबरण्याचे काहीच कारण नाही. सवाल बहूमत मिळवण्याचा नसून मोठा पक्ष होण्याचा आहे. पण त्यात भाजपाला मागे टाकले, तर पुढल्या काळात राज्यव्यापी आव्हान उभे करता येणार आहे. पण आताच पालिकेची सत्ता टिकवण्यासाठी भाजपाला डोईजड होऊ दिले, तर भाजपा कायमचा शिरजोर होण्याचा धोका आहे. किंबहूना तोच धोका संपवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी युती मोडण्याचा पवित्रा घेतलेला आहे.

युती मोडल्यानंतर सेनेच्या नेत्यांनी कडवी भाषा वापरलेली आहे. पण भाजपाच्या गोटातून कुठलीही टिखट प्रतिक्रीया चटकन येऊ शकलेली नाही. त्यामुळेच भाजपासाठी उद्धव ठाकरे यांचा निर्णय अनपेक्षित असल्याची खात्री पटते आहे. घासाघीस होईल व जागा कमीअधिक दिल्या घेतल्या जातील. पण युती मोडण्याचे धाडस शिवसेना करणारच नाही, अशी भाजपाला खात्री असावी. तीच फ़सली आहे. त्यामुळेच भाजपाच्या गोटात शांतता पसरली आहे. सामान्यपणे आधीच स्वबळावर लढायच्या गर्जना खुप झालेल्या आहेत. त्यामुळेच आता सेनेच्या घोषणेनंतर त्याचाच पुनरुच्चार झाल्यास नवल नाही. पण नुसत्या गर्जना आणि आक्रमणासाठी लागणारे बळ; यात मोठा फ़रक असतो. अन्य पक्षातले उमेदवार गोळा करून आमदार खासदार जिंकणे सोपे असते. स्थानिक मतदानात ओळखीच्या व परिचयातल्या उमेदवारांची गरज असते. तसे व तितके उमेदवार भाजपाकडे मुंबईत तरी नाहीत. उलट तीच सेनेची जमेची बाजू आहे. त्यामुळेच उद्धवनी हा जुगार खेळलेला आहे. त्यात त्यांना अपेक्षेइतके यश मिळाले, तर मात्र राजकारणाची गणिते बदलून जातील. स्वबळावर मुंबई-ठाणे सेनेने जिंकले तर राज्य मंत्रीमंडळात अधिक हिस्सा मागणे वा त्याला हादरे देण्यापर्यंतची मजल सेना मारू शकते. त्याच दिशेने टाकलेले हे पाऊल आहे. त्यात मग आडमार्गाने कॉग्रेस वा राष्ट्रवादीही सेनेला साथ देऊ शकतील. कारण त्या दोन्ही पक्षांमध्ये आज भाजपाची घोडदौड रोखण्याइतके बळ उरलेले नाही. पण त्याला अपशकून होऊ शकेल असे काही व्हायला ते हातभार लावू शकतील. पालिका निकालात सेनेला यश मिळाल्यास भाजपासाठी म्हणूनच समस्या सुरू होतील. मात्र तितके मोठे यश उद्धव मिळवू शकले नाहीत, तरी त्यांचा सत्तेतील सहभाग कायम राहिल. भाजपाला मोठा पक्ष होताना कॉग्रेसच्याही मागे पडायची वेळ आली, तर मात्र नामुष्की असेल.

No comments:

Post a Comment