Sunday, January 29, 2017

कौरवपांडवांचे अकांडतांडव

महासंत पप्पू कलानी

omie kalani with BJP के लिए चित्र परिणाम

गुरूवारी प्रजासत्ताकदिनी जिथे शिवसेनेचा मेळावा झाला, तिथेच शनिवारी भाजपाचा मेळावा झाला. त्या मेळाव्यात सेनेला चोख उत्तर दिले जाईल, अशी अपेक्षा केली जात होती आणि त्याची तशी सुरूवातच मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी केली. सुरूवात त्यांनी शिवसेनेला कौरव ठरवून केली आणि मजेची गोष्ट अशी, की आपल्याच या महान नेत्याचे शब्द मुख्यमंत्र्यांना नंतर पहिल्याच वाक्यात खोडून काढावे लागले. शेलार यांनी सेनेला कौरव ठरवले आहे, पण तसे मी मानत नाही. कारण ते मान्य करायचे, तर माझ्या मंत्रीमंडळात रोज कौरवांच्या सोबत बसतो, असे मानावे लागेल. थोडक्यात ज्या प्रतिमा वा उपमा वापरल्या जातात, त्याविषयी भाजपात कोणतेही सामंजस्य नाही. सोयीसाठी कुठल्याही उपमा वा प्रतिमा वापरून चालत नसते. त्या उपमा आपल्यावर नेमक्या उलटणार नाहीत, याचीही काळजी घ्यायची असते. इतकी बुद्धी शेलारांकडे असती, तर त्यांनी ‘कौरवा-पांडवा, तुझ्या नावात रे गोडवा’, अशा गीतेने सभेला आरंभ केला नसता. महाभारतातील ज्या प्रसंगाचे उदाहरण शेलार देत होते, त्यातला अहंकार दुर्योधनाचा होता यात शंकाच नाही. पण दुर्योधनाने जी संपत्ती बळकावलेली होती, ती फ़सवा जुगार खेळून, बेसावध पांडवांकडून पळवली होती. त्याचे परिणाम म्हणून वनवास व अज्ञातवास भोगून आलेले पांडव, पुन्हा नव्याने सुरूवात करण्यासाठी किरकोळ गोष्टी मागत होते. भाजपाने मागितलेल्या जागा किरकोळ होत्या काय? विधानसभेचा प्रसंग असो किंवा आजचा प्रसंग असो, त्यात भाजपाने मागितलेल्या जागा किरकोळ नव्हत्या, तर मोठा हिस्सा मागितलेला होता. म्हणूनच तिथे कृष्णशिष्टाईचा विषय येत नाही. आधी शेलारांनी महाभारत समजून घेण्याची गरज आहे. मग त्यातले पांडव कौरव किंवा कृष्ण कोण, त्याची उदाहरणे देता येतील. तसे नसते तर देवेंद्र फ़डणवीस यांना त्याच व्यासपीठावरून शेलारांची चुक दाखवावी लागली नसती.

दुसरी गोष्ट अशी, की भगवा घेऊन खंडणीखोरी करू दिली जाणार नाही; अशी भाषा मुख्यमंत्र्यांनी वापरण्याचे औचित्य काय होते? आपल्याच सरकारमधील आपल्याला ज्येष्ठ असलेल्या नाथाभाऊ खडसे यांचा राजिनामा कशासाठी घ्यावा लागला, त्याचेही स्मरण मुख्यमंत्र्यांना राहिलेले नाही काय? किरकोळ म्हणाव्या अशा उल्हासनगर पालिकेसाठी पप्पू कलानीच्या गळ्यात गळे घालणार्‍यांनी किती सोवळी भाषा करावी? त्याच मंत्रीमंडळातील कौरव म्हटलेल्या कुणा शिवसेना मंत्र्याचा राजिनामा घ्यावा लागलेला नाही. पण खडसे यांना गंभीर आरोपासाठी जावे लागले आहे. अनेक आरोप भाजपाच्याही इतर नेत्यांवर झालेले आहेत. तेव्हा दुसर्‍याच्या घरावर दगड मारताना आपणही काचेच्या घरात वास्तव्य करतोय, याचा विसर पडून चालत नाही. खंडणीखोरीचे आरोप असलेले अनेक नेते अन्य पक्षातून भाजपात हारतुरे घालून आणलेले आहेत आणि भाजपातल्याही अनेक नेत्यांवर तसे आरोप सातत्याने झालेले आहेत. त्याच व्यासपीठावर बसलेले आमदार राजपुरोहित यांची एक चित्रफ़ित वाहिन्यांवर झळकलेली होती. त्यांनी आपल्याच नेत्यांवर पैशाचे केलेले आरोप अजून पुसले गेलेले नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्र्यासारख्या जबाबदार व्यक्तीने, शेलारांच्या पातळीवर उतरून तोंडपाटिलकी करण्यात शहाणपणा नसतो. बोलता आले तरी कुठे थांबावे याचेही भान असायला हवे. शिवसेनेकडून काय भाषा वापरली जाते याची आठवण करून देताना; आपणही काय भाषा बोलतोय त्याचे भान सोडून चालत नाही. कल्याण डोंबिवलीत जबड्यात हात घालून दात मोजायची भाषा होती आणि आज पाणी पाजायची भाषा आली. ती स्थिती खुप केविलवाणी होती. आपल्या भाषणाच्या अखेरीस तावातावाने बोलणार्‍या फ़डण्वीसांचा घसा बसला. त्यात काही गैर नाही. सतत भाषण करणार्‍यावर तसा प्रसंग येतो. पण तेव्हा कसे वागावे किंवा बोलावे, याचेही भान त्यांना ठेवता आले नाही. आपले भाषण वाहिन्यांवर थेट प्रक्षेपित होते आहे, एवढेही मुख्यमंत्र्यांना ठाऊक नव्हते काय?

आपल्या भाषणाच्या अखे्रीस देवेंद्र यांचा आवाज बसला. त्यांना पाणी पिण्याची वेळ आली. आवेशात बोलताना आपला आवाज बसू शकतो, म्हणून संयमी भाषेत व आवाजात बोलावे, याचे भान राखायला हवे. तसे झाले असते तर अशा मोक्याच्या क्षणी आवाज बसण्याचा प्रसंगच आला नसता. अर्थात असे प्रसंग पुर्वसुचना देऊन येत नसतात. पण अशा वेळी कसा संयम दाखवावा, याचे भान राखण्यात मोठेपणा असतो. आपला आवाज बसला आहे आणि तशाच आवाजात आवेश दाखवला, तर भाषेसह शब्दही केविलवाणे होऊन जातात. हे नित्यनेमाने भाषण करणार्‍यांना अन्य कोणी समजावून द्यायला हवे काय? शनिवारी अशा महत्वाच्या व्यासपीठावर ती स्थिती आली व मुख्यमंत्री केविलवाणे दिसले. त्याला तेच जबाबदार आहेत. जिथे आवाज बसला तिथेच ते थांबले असते आणि पुढले शब्द बोलण्यापेक्षा त्यांनी थोडीफ़ार घशाला विश्रांती दिली असती, तर खुप बरे झाले असते. घसा बसल्याने आपल्या तोंडातून निघणारे शब्द लोकांना धड ऐकू जात नाहीत आणि त्यातला आवेशही अगदी हास्यास्पद होऊ शकतो, हे त्यांना लक्षात कसे आले नाही? ‘आज पाणी पितोय पण लौकरच पाणी पाजेन’, अशी भाषा बोलणार्‍याचा आवाज पिचका असून चालत नाही. पण त्याही अवस्थेत मुख्यमंत्र्यांना ते निरर्थक शब्द बोलण्याचा मोह आवरला नाही, याचे आश्चर्य वाटते. कारण हे काही लहान मुलातील बॅट वा बॉल संबंधाने जुंपलेले भांडण नव्हते. राजकारणातला प्रदिर्घ संघर्ष आहे. त्यावरून खुप काळ वादविवाद चालायचे आहेत. सहाजिकच आज अर्धवट राहिलेले शब्द उद्याही बोलण्याची सवड होती. पण तिथल्या तिथेच तसे शब्द बोलून पोरकट आविष्कार करण्याने विपरीत परिनाम होईल, हे लक्षात कसे येत नाही? कुठे भाषण थांबवावे आणि कुठे आवेशाला आवर घालून संयम राखावा, हे विसरल्याचा तो परिणाम होता.

केजरीवाल किंवा राहुल गांधी रोजच्या रोज मोदींवर अनेक आरोप करतात. पण त्यांना धडा शिकवण्याची भाषा वा चोख प्रत्युत्तर देण्याच्या भानगडीत पंतप्रधान एकदाही पडलेले नाहीत. आपल्या कृतीतून वा वेळ साधून, ते अशा आरोपांचा नेमके उत्तर देत असतात. अशा नेत्याच्या लोकप्रियतेवर स्वार झालेल्या शेलार वा तत्सम नेत्यांना मोदींना मदत करता आली नाही, तरी हरकत नाही. पण त्यात बाधा येणार नाही, इतके भान राखायला हरकत नसावी. कुठे व काय बोलत आहोत, याचे अजिबात भान नसलेल्या अशा नेते व सवंगड्यांपासूनच मोठ्या नेत्यांना कायम धोका असतो. असल्याच वाचाळतेने दिल्लीत भाजपाचा धुव्वा उडाला आणि केजरीवाल उठताबसता मोदींची खिल्ली राजधानीतच उडवण्यास मोकळे झाले. मोदींच्या लोकप्रियतेवर आरुढ झालेल्यांनी आपल्या मस्तीने लोकमताला इतके डिवचलेले होते, की अशा भाजपा नेत्यांना त्यांची योग्य जागा दाखवण्यासाठी दिल्लीकर जनतेने केजरीवाल यांना अफ़ाट यश बहाल केले. तेव्हा केजरीवालनी कोणाला पाणी पाजले होते? खरे तर अमित शहांना पाणी पाजले होते. पण आपण मोदींना पाणी पाजले, असेच केजरीवाल गावभर सांगत फ़िरत राहिले आहेत. अमित शहा नामानिराळे राहिले. आताही मुंबईमध्ये शेलार सोमय्या आदी लोकांची जी तोंडपाटिलकी चालू आहे, त्याचे उद्या परिणाम समोर येतील. तेव्हा नाक कोणाचे कापले जाईल? शेलार यांच्याकडून तितक्या शहाणपणाची अपेक्षा नाही. पण देवेंद्र फ़डणवीस यांना असे बेछूट बोलताना वा भान सुटलेले यापुर्वी कधी बघितले नाही. घसा बसला असताना नेमके नको तेच शब्द उच्चारण्याचा त्यांना अट्टाहास बघितला, तेव्हा वाईट वाटले. महाभारतामध्ये वस्त्रहरणाचाही एक खुप गाजलेला प्रसंग आहे. उद्या तशी वेळ आली, तर शेलार बाजूला रहातील आणि फ़डणवीसांना हकनाक त्यात बळी व्हावे लागेल. म्हणूनच कुठे थांबावे याचा त्यांनी विचार केलेला बरा.

3 comments:

  1. Bhau ! vastraharan shivsenevar aale tar kay hoil hyacha dekhil paramarsh ghya.

    ReplyDelete
  2. भाऊ शिवसेना १०० ते १०५ भाजपा ७० ते ८० झाले तर ??

    ReplyDelete