Friday, January 27, 2017

सिंहासन ते पद्मासन

sharad pawar cartoon के लिए चित्र परिणाम

गेले काही दिवस शरद पवार यांना राष्ट्रपती पदाचे उमेदवार बनवण्याचे अनेकांचे प्रयास चालू आहेत. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही बारामतीला भेट देऊन पवारांची पाठ थोपटली आहे. काम करावे तर पवारांसारखे, असे गौरवोद्गार मोदींनी अनेकदा काढलेले आहेत. किंबहूना पवारांकडूनच आपण राजकारणाचे घेतले वा गिरवले असेही पंतप्रधानांनी सांगितलेले आहे. बोट धरून पवारांनी राजकारण शिकवल्याचे पंतप्रधान बोलल्यापासून साहेब कायम हाताच्या बोटांची मूठ करून असतात. उगाच परस्पर कोणी बोट धरायचे आणि आपल्याला टांग मारून पंतप्रधान पद बळकवायचे प्रसंग वारंवार घडू नयेत, अशी त्यांची इच्छा असावी. कारण मोदी जेव्हा त्या सर्वोच्च पदाचे उमेदवार झाले, तेव्हा गुरुजींनी काढलेले उदगार मोदींनी ऐकलेले नसावेत. पवार क्रिडाक्षेत्रातही खुप काम केलेले आहेत आणि त्याचा अनुभव सांगताना म्हणाले होते, की मॅराथॉन धावणारा स्पर्धक खुप संथ सुरूवात करतो आणि अखेरच्य़ा टप्प्यासाठी आपली उर्जा राखून ठेवतो. पण मोदींनी खुप आधीच वेगाने दौडायला आरंभ केला असे पवारांचे मत होते. थोडक्यात इतकी घाई करून पंतप्रधानपदी विराजमान होता येणार नाही, असेच गुरूजींचे भाकित होते. पण शिष्याने गुरूला खोटा पाडून दाखवले. अर्थात गुरूला चकीत करण्यात मोदींच्या इतका बिलंदर कोणी नाही. असे अनेक गुरू पचवून हा माणूस दिल्लीच्या तख्तावर आरुढ झाला आहे, ते ओळखण्या इतके पवार चतुर नक्कीच आहेत. मग त्यांनी ह्या बोट पकडण्याला मान्यता दिलीच कशी, ते समजत नाही. कारण आता त्यांनाच मोदी राष्ट्रपतीपदी विराजमान करणार असे बोलले जात असताना, साहेबांनी त्याचा साफ़ इन्कार केला आहे. त्यासाठी एक राजकीय तर्कही मांडलेला आहे. ज्या पक्षाचे संसदेतील बळ अवघे १२ खासदारांचे आहे, त्याने राष्ट्रपतीपदाची अपेक्षा बाळगू नये, असे त्यांनी म्हटलेले आहे.

कुठलाही महत्वाकांक्षा बाळगणारा नेता राष्ट्रपतीपदी विराजमान होतो काय? हा पहिला प्रश्न आहे. कारण यापुर्वी कुठल्याही नेत्याने तशी महत्वाकांक्षा बाळगली व त्यासाठी प्रयत्न केले, असे दिसलेले नाही. नाही म्हणायला गुरूजींच्याच पक्षाचे एक संस्थापक पुर्णो संगमा यांनी गेल्या खेपेस तसा प्रयत्न केला आणि गुरूजींनी त्यांना पक्षातूनच हाकलून लावलेले होते. संगमा यांनी प्रणब मुखर्जी यांच्या विरोधातला उमेदवार होण्याचा चंग बांधला आणि विविध पक्षांशी हातमिळवणी करून उमेदवारीही केली होती. तर साहेबांनी संगमांना पक्षातून हाकललेच. अधिक त्यांची कन्या केंद्रात राज्यमंत्री होती, तिला हुसकावून काढण्यास तात्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांना भाग पाडले होते. मात्र तेव्हाही किंवा नंतर कधी, साहेबांनी त्या पदाची महत्वाकांक्षा बाळगली नाही. तेच कशाला मुखर्जी वा अन्य कुठल्या राष्ट्रपतीनेही तशी महत्वाकांक्षा बाळगल्याचे कोणाच्या ऐकीवात नाही. राजकारणाच्या मुख्यप्रवाहातून कोणाला निवृत्त करायचे असेल, किंवा जो शक्यतो पंतप्रधानासमोर नतमस्तक होईल, त्यालाच अशी महत्वाकांक्षा बाळगण्याची मुभा मिळालेली आहे. अन्यथा प्रतिभा पाटील वा मुखर्जी यांना तिथे कशाला बसवले गेले होते? प्रणबदा सोनियांच्या कामात अडथळा झालेले होते आणि प्रतिभाताईंना कुठलाही स्वाभिमान नव्हता. सहाजिकच अशा पदाची महत्वाकांक्षा शरद पवार बाळगतील, ही कोणी अपेक्षा करू शकत नाहीत. पण स्वत:च्या संसदेतील शक्तीच्या बळावर कधी नेहरू, इंदिराजी, राहुल वा वाजपेयींनीही राष्ट्रपती पदाची महत्वाकांक्षा बाळगलेली नव्हती. त्यामुळे आपल्या पक्षाकडे संसदेतले पाठबळ कमी असल्याचा उल्लेख साहेबांनी कशाला केला, त्याचा उलगडा होत नाही. पण काहीतरी कंड्या पिकवून पवारांना चर्चेत ठेवण्याचा छंद पवारांच्या काही हितचिंतकांना जडलेला आहे. त्यामुळे अशा अफ़वा उठत असतात.

आजच्या क्षणी दिल्लीची अवघी प्रस्थापित व्यवस्था मोदींना तिथे आपला पाय रोवून काम करू देण्यात शेकड्यांनी अडथळे आणत आहे. अशावेळी आपल्या घटनात्मक जबाबदारीचे चोख पालन करणारा काटेकोर राष्ट्रपती असल्यानेच, मोदींना सुखनैव थोडेफ़ार काम करता येते आहे. अशा जागी पवार बसलेले असतील, तर काय काय मजा करू शकतील, त्याची कल्पनाही थरारक आहे. आता शिवसेनेने भाजपाशी असलेली वा होणारी युती संपुष्टात आल्याची घोषणा करताच, पवारांनी त्यावर व्यक्त केलेले मत, त्यांच्या ज्येष्ठतेला शोभा देणारे आहे काय? पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी युती तुटल्याचे दु:ख व्यक्त केले. पण ते दु:ख लोकांना दिसण्यापुर्वीच सत्तेतून सेना बाहेर पडल्यावर पुढला विचार करता येईल. असेही सांगितले. अर्थात तशी अपेक्षा पवार दिर्घकाळ बाळगून आहेत. उद्धव पित्याप्रमाणे स्वाभिमान दाखवून सरकारमधुन बाहेर पडत नसल्याचेही दु:ख त्यांनी अनेकदा व्यक्त केले आहे. सेना सत्तेतून बाहेर पडल्यास फ़डणवीस सरकार चालू शकणार नाही. त्याला अन्य कोणाचा तरी बहूमत सिद्ध करण्यासाठी पाठींबा आवश्यक आहे. तो अर्थातच पवारांच्या पक्षाचा असू शकतो. राष्ट्रपती होण्यासाठी लागणारे संख्याबळ भले राष्ट्रवादी पक्षापाशी नसेल. पण महाराष्ट्रात भाजपाला बहूमताला कमी पडणार्‍या जागांच्या इतके संख्याबळ पवारांच्या पक्षापाशी नक्कीच आहे. सहाजिकच तसा प्रसंग आलाच तर काय करता येईल, त्यावर तेव्हाच बोलता येईल, असे म्हणून पवारांनी योग्य संकेत दिला आहे. राष्ट्रवादीही देवेंद्र सरकार चालवायला पाठींबा देईल, असा त्याचा अर्थ आहे. त्यामुळेच उद्धव ठाकरे यांनी पित्याचा स्वाभिमान दाखवून सत्तेवर लाथ मारण्याची अपेक्षा कुठून येते, त्याचा खुलासा होऊ शकतो. सिंहासन हे पवारांचे आवडते योगासन आहे. पण त्याने सतत साहेबांनी हुलकावणी दिलेली आहे. त्याची वेदना काही केल्या संपत नाही, इतकाच त्याचा अर्थ आहे.

सरकार चांगले चाललेले नाही अशी टिका त्यांचाच पक्ष सतत करणार आणि तेच नालायक दिवाळखोर सरकार पडण्याची वेळ आली, तर त्याला जगवायलाही त्यांचाच पक्ष पुढे जाणार. तेव्हा मग राज्याच्या दिवाळखोरीचा मुद्दा मागे पडतो आणि राज्याला नव्याने निवडणूका परवडणार नाहीत, असा मुद्दा ऐरणीवर आणला जात असतो. याप्रकारची अनेक राजकीय योगासने करण्यातच पवारांनी आजवरचे आयुष्य़ खर्ची घातले आणि योगासनांचे आग्रही असलेल्या नरेंद्र मोदींनी त्याच शरदासनांचा बारकाईने अभ्यास करून राजकारणाचे धडे गिरवलेले असावेत. अन्यथा पंतप्रधानांनी बारामतीला जाऊन गुरूजींना प्रमाणपत्र कशाला दिले असते? राहिला विषय राष्ट्रपतीपदाचा! पवारांना राष्ट्रपतीपदी बसवले म्हणून राजकीय उचापती करण्याचा मोह त्यांना आवरेल, अशी कोणी हमी देऊ शकतो काय? तसे शक्य असते तर त्यांनी युती तुटण्याविषयी इतकी छचोर प्रतिक्रीया दिलीच नसती. देश व राज्याच्या राजकारणात अर्धशतक मुरलेल्या या माणसाने इतके आशाळभूत मतप्रदर्शन केलेले बघून, त्यांच्या मित्रच नव्हेतर टिकाकारांनाही लाज वाटेल. पक्षाची धुळधाण उडालेली आहे आणि पदोपदी आपली प्रतिष्ठा मातीमोल झालेली असतानाही, पवार राज्यामध्ये भाजपाच्या सरकारशी सहकार्य करून काही सौदा करू बघतात. तेव्हा त्यांना आपली आजवरची तपस्याही मोलाची वाटत नाही, याचे नवल वाटते. कुठल्याही भांडणातून आपला राजकीय लाभ शोधण्याच्या संधीसाधूपणाने, या माणसाच्या राजकीय कारकिर्दीला पोखरून टाकले आणि अंगभूत गुणांना किड लावली. त्यापासून वयमानाने दूर रहाण्याची वेळ आलेली असतानाही त्यात लुडबुडण्याचा मोह सूटत नसेल; तर राष्ट्रपतीपदाच्या मर्यादा कशा पाळल्या जातील? हे गुरूजींना कळत नसले तरी शिष्याला कळत असावे. म्हणूनच त्याने पद्मविभूषण बहाल करून सिंहासनापेक्षा गुरूजींना पद्मासन घालून बसायला भाग पाडलेले असावे.

3 comments:

  1. भाऊ, पंजाब बद्दल लिहा काही तरी

    ReplyDelete
  2. आपल्याला डोईजड होतील अशी माणसे दूर ठेवण्याची मोदी यांची पद्धत लक्षात घेतली तर ते पवार याना राष्ट्रपती बनवतील हे शक्य वाटत नाही .

    ReplyDelete