चरखाधारी भाईयो,
मुंबईतून प्रसिद्ध होणार्या ‘महाराष्ट्र टाईम्स’ या वर्तमानपत्रातील माझी वकिली नुकतीच वाचली आणि अनावृत्तपत्र लिहीण्याची अनिवार इच्छा झाली. कारण एकटे हे वर्तमानपत्रच नाही, तर विविध पक्ष प्रवक्ते, नेते व विचारवंतांनी माझ्या नावे ज्या काही गोष्टी खपवण्याचा उद्योग केला, त्याची मलाही लाज वाटू लागली आहे. खादी ग्रामोद्योग आयोगाच्या कुठल्या कॅलेन्डरमध्ये माझ्या फ़ोटोची जागा अन्य कोणी व्यापली, म्हणून चिंतीत झालेल्या एकविसाव्या शतकातील माझ्या अनुयायांनो, तुमच्याइतकी माझी बदनामी किंवा अवहेलना दुसरा कोण करू शकेल का? ‘महात्म्याला तरी सोडा’ असा अग्रलेख लिहीणार्याला माझा वैचारिक वारसा कोणा दुसर्याने हिसकावून घेतल्याचे दु:ख झाले आहे. पण माझा वारसा कुठला त्यापेक्षा अशा संपादकाने त्याचा वारसा कुठला, ते जरा स्वातंत्र्य चळवळीच्या दरम्यानचे टाईम्सचे अंक चाळून तपासला असता तर बरे झाले असते. तेव्हा संघाचे लोक काय करीत होते किंवा माझी हत्या करायला कोण टपलेला होता, त्याची जंत्री आठवणार्यांनी टाईम्स माझ्या विचारांना किती प्राधान्य देत होता, तेही तपासून बघावे. माझ्या प्रेरणदायी विचारांचे कौतुक आज टाईम्सच्या वारसांना वाटते आहे, तेच विचार मी प्रत्यक्ष हयात असताना व मांडत असताना टाईम्सने त्यातून किती प्रेरणा घेतली होती? हा संपादक लिहीतो की ‘राजकारणात विरोधी मतांचाही आदर करण्याची शिकवण महात्म्याने दिली. त्याच्या अनुयायानाही गेल्या साठ वर्षामध्ये त्यांनी सांगितलेल्या मार्गावर चालणे शक्य झाले नाही.’ इतके असंबंद्ध लिहीण्याची प्रेरणा या संपादकाला कुठून मिळाली, त्याचे मला नवल वाटते. जर माझेच अनुयायी माझे अनुकरण साठ वर्षे करू शकलेले नसतील; तर टाईम्स किंवा संघाचा कोणी स्वयंसेवक तरी त्याचे कितीसे अनुकरण करू शकणार आहे? त्याचे राहू देत, तुमच्यासारख्यांनी जरी माझी पाठ सोडलीत तरी उपकृत होईन.
बाळ संपादका, तूच लिहीतोस की ज्यांनी माझी हत्या केली, त्याचे समर्थन करणार्यांचा अनुयायी देशाचा पंतप्रधान झाला आहे. मग ज्यांनी मला जिवंतपणी सोडले नाही, त्याच्याकडून मरणोत्तर मला सोडण्याची अपेक्षा कुठल्या निर्बुद्धतेचे लक्षण मानायचे रे? आणि कुठल्या विचाराची महत्ता सांगतोस? माझ्याच अनुयायांना अनुकरण जमले नाही, तर इतरांची गोष्ट कशाला? साधेपणा हा माझा बाणा राहिला, तो साधेपणा ज्यांना कधी उमजलाच नाही, त्यांना तुम्ही माझे आजकालचे अनुयायी म्हणून जनतेच्या माथी मारत असता. काही दिवसांपुर्वी टाईम्सच्याच एका बातमीत महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि दिल्लीतला स्मारक निधी यांच्यातला भुखंडविषयक वाद सुप्रिम कोर्टापर्यंत गेल्याची बातमी वाचनात आली. माझे विचार वा आचार असे कज्जेदलालीचे होते कायरे मुला? माझ्याच नावाने चालणार्या दोन संस्था एकमेकांशी भूखंडाच्या मालकीवरून एकमेकांच्या उरावर बसतात, तो कुठला गांधीविचार असतो? कधी त्यावर दोन शब्द लिहायची बुद्धी तुम्हा संपादकांना झाली आहे काय? कुठले कॅलेन्डर वा डायरीवरचा माझा फ़ोटो तुम्हाला गांधी वाटतो. पण हयातीत मांडलेले विचार प्रतिदिन पायदळी तुडवले जातात, तेव्हा सराईतपणे तिकडे पाठ फ़िरवून, तुम्ही पळ काढता. पळपुटेपणा मी दिलेली प्रेरणा असते कायरे? किती म्हणून माझी अवहेलना करणार तुम्ही? माझेच पुतळे आणि प्रतिमा पुढे करून साठ वर्षे सरकारच्या तिजोर्या अनुदानाच्या नावाने लुटल्या गेल्या, तेव्हा तुम्ही कुठल्या साखरझोपेत निद्रीस्त झालेले होता? मला पुतळ्यात गाडला, बंदिस्त केला की माझ्या नावावर काहीही गांधीचा वारसा किंवा विचार म्हणून भेसळीचा माल खपवण्याची सवय अजून जात नाही ना? मोदी तर संघाचा स्वयंसेवक; त्याच्याकडून कसली अपेक्षा करणार? पण त्यापेक्षा माझ्याच तथाकथित अनुयायांनी या महात्म्याच्या जाचातून सोडवले तर खुप उपकार होतील रे!
जाशील तिथे माझे पुतळे करून ठेवलेत. गांधीचौक नाव द्यायचे आणि त्याच्याच सभोवती इतकी घाण उकिरडा करून ठेवायचा, की पुतळ्यातला बंदिस्त बापू आपल्या नाकाला रुमालली लावू शकत नाही. कुठे मला हात नसतात, तर कुठे मला चबुतर्यावर एका पावलावर उभा करून ठेवलेला असतो. कधी भोवतालच्या त्या उकिरड्यावर दोन शब्द लिहाल कायरे? गांधी नाव घेतलेल्या संस्थांमध्ये चाललेल्या अफ़रातफ़री दिसतील कायरे तुम्हाला? तुमच्या असल्याच भोंगळपणाने माझे जन्मस्थान असूनही गुजरातमधून लोकांनी मला हद्दपार केले. ती कुणा नरेंद्र मोदीची किमया नाही. ते तुमचे पाप आहे. गेली दहा वर्षे अशी गेलीत, की जगत कोणी गांधीनु गुजरात असे बोलत नाही. सर्वांच्या तोंडी मोदीनु गुजरात, हेच शब्द असतात. त्या माणसाने गुजरातसाठी, तिथल्या जनतेसाठी काहीतरी केले नसते, तर लोक बापूला कशाला विसरून गेले असते. खरे तर त्या मोदीने काय केले, त्यापेक्षा तुमच्यासारख्या गांधी अनुयायांच्या पापकर्मानेच त्याला मोठा करून ठेवले आहे. त्याचे मोठेपण इतके नव्हते, की त्याच्यासमोर मोहनदास करमचंद गांधी पुसला जावा. माझा वारसा म्हणून जी पापे राजरोस होत गेली, त्यातून मला इतका खुजा बनवला गेला, की मोदी इतका मोठा अक्राळविक्राळ भासू लागला. मीठाचा सत्याग्रह दांडीयात्रा म्हणून जो सोहळा कॉग्रेस व सोनियानी योजला, त्यात कलापथकातल्या मुलींवर बलात्कार झाले. त्यावेळी कोणाला बापू आठवला होता कायरे? त्याच सोहळ्यात सहभागी व्हायला दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दिक्षीत गुजरातला आल्या, त्या दिल्लीत मीठावर कर लादून! देशात माझे स्मरण म्हणून कधी मीठावर कुठल्या सत्ताधीशाने कर लादला नाही. तोच लादण्याला माझा प्रेरणादायी विचार म्हणतात कारे? कृपया तुमच्यासारख्या गांधीवादी विचारवंतांनी माझी पाठ सोडली, तर पुढल्या पिढ्यांसाठी माझे थोडेफ़ार महात्म्य शिल्लक उरले.
डायरीवरला, कॅलेन्डरचा फ़ोटो किंवा कुठल्या चौकातला पुतळा, म्हणजे बापू नसतो रे! बापू साधेपणात सामावलेला असतो. माझा कुठलाही फ़ोटो काढून बघ. प्रत्येकवेळी जमिनीकडे नजर होती माझी. बापूच्या नावावर आपले विचार व आचारांची भेसळ करून लोकांच्या माथी मारत गेलात, त्याचे हे दुष्परिणाम आहेत. पोटच्या पोराला कुणी व्यापार्याने दिलेली शिष्यवृत्तीही योग्य तरूणाला बहाल करणार्या बापूची तरफ़दारी; सोनिया वा राहुलच्या कॉग्रेससह तुमच्यासारखे त्यांचेच विक्रेते करू लागतात, तेव्हा नथूरामही भला वाटतो. त्याने गोळ्या घालून एका मिनीटात मला संपवले. तुमच्या्कडून व्हायची माझ्या बुद्धीची, विचारांची वा आचारांची विटंबना बघायला शिल्लक ठेवले नाही. हेही उपकार वाटू लागतात. कधीकधी वाटते आपल्या हयातीत अशी विटंबना बघावी लागली नाही, हे सुदैव! आपले अनुयायी व पाठीराखे विक्रेते होऊन महात्माच बाजारात विकू लागतात, तेव्हा आपलीच शरम वाटू लागते. माझे साधेसोपे विचार अनुकरणाला अशक्य असल्याचे लिहीणारे बुद्धीमान संपादक निपजू लागतात, तेव्हा वारसा पुसायला अन्य कोणी शत्रू आवश्यक नसतो. गुजरातच्या दंगलीचे भांडवल करणार्यांनी गुजरातमधून माझे नाव कधीचेच पुसून टाकले आहे. उरलेसुरले सामान्य लोक मला थोडाफ़ार ओळखतात, तेवढ्यात मी खुप समाधानी आहे. माझी पाठ तुमच्यासारख्या पाखंडी गांधीवाद्यांनी सोडली, तरी खुप झाले. सोन्याची चोरी झाली म्हणून त्याचे मोल संपत नाही आणि सोन्याची महत्ता सांगायला कुणा जव्हेर्याची गरज नसते. म्हणून कृपा करा, माझा मांडलेला बाजार आवरा. मला कुणाच्या मार्केटींगची गरज नाही. पुतळ्यात सामावण्याइतका बापू क्षुल्लक नाही, की कुणा मोदीचा फ़ोटो माझ्या जागी छापला गेल्याने माझे महात्म्य संपत नाही. नथूराम माझा विचार मारू शकला नसेल, तर फ़ोटो बदलून मी कसा संपेन? तुम्हाला खरा गांधी पचला नाही, कळला नाही. फ़ोटोसाठी आक्रोश करणार्यांनो जरा विचार करायला शिका. खरा बापू त्याच्या विचारात सामावलेला आहे. कृपया माझी पाठ सोडा.
गांधीवादाने भेडसावलेला बापू
पाकिस्तानला झुकते माप देण्याचा गांधीजिंचा दुराग्रह चुकीचा होता, हे आता तरी कबूल करायला नको का?
ReplyDeleteबरोबर
Deleteछान
ReplyDelete